तीन दुचाकीसह २२ मोबाईल जप्त
By Admin | Updated: July 6, 2015 00:18 IST2015-07-06T00:12:33+5:302015-07-06T00:18:05+5:30
तुळजापूर : शहर व परिसरात झालेल्या चोऱ्यांचा तपास लावण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष पोलीस पथकाने मागील महिनाभरात आठ चोरीच्या घटनांचा छडा लावला आहे.

तीन दुचाकीसह २२ मोबाईल जप्त
तुळजापूर : शहर व परिसरात झालेल्या चोऱ्यांचा तपास लावण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष पोलीस पथकाने मागील महिनाभरात आठ चोरीच्या घटनांचा छडा लावला आहे. संबंधित चोरट्यांकडून तीन दुचाकीसह २२ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत तर आठ संशयितांवर प्रतिबंधात्मक स्वरुपाची कारवाई केली.
शहर व परिसरामध्ये मागील काही महिन्यापासून चोरीच्या लहान-मोठ्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आठवडी बाजारातही मोबाईल चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने अशा चोरट्यांना पकडण्यासाठी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती केली होती. या पथकाने महिनाभरात सात ते आठ चोरीच्या घटनांचा छडा लावला आहे. तुळजापूरच्या सारा गौरव कॉलनीतील नानाजी सावंत यांची दुचाकी चोरीला गेली होती. सदरील चोरट्यांचा तपास घेण्यासाठी नेमलेल्या या पथकास २ जुलै रोजी सदरील दुचाकी गावसूद येथील जितू पवार याच्याकडे आढळून आली. पोलिसांनी दुचाकी लागलीच जप्त केली. तसेच पाझर तलावावर बसविण्यात आलेला विद्युतपंप व विद्युत मोटार अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. सदरील ऐवज वडगाव काटी येथून जप्त करण्यात आला. या प्रकरणी देविदास पवार यास अटक करण्यात आली आहे. त्याने तुळजापूरसह नळदुर्ग, तामलवाडी शिवारातील विद्युतपंप चोरी केल्याचे कबूल केले आहे. दरम्यान विशेष पोलीस पथकाने महिनाभरात २८ गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक स्वरुपाची कारवाई केली आहे. हे पथक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. पथकात पोलीस उपनिरीक्षक एस. जोंधळे, पोउपनि. आर. भंडारी, पोलीस हवालदार आनंद गायकवाड, रमाकांत शिंदे, पोहेकॉ. व्ही. कोळी, एस. करवर, आर. कांबळे आदींचा समावेश आहे. (वार्ताहर)