मृतसाठ्यातून २१८ दलघमीचा उपसा

By Admin | Updated: June 2, 2016 01:21 IST2016-06-02T01:12:33+5:302016-06-02T01:21:20+5:30

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यातून आतापर्यंत २१८ दलघमीचा उपसा करण्यात आला आहे.

218 Dalhmi paws from the dead body | मृतसाठ्यातून २१८ दलघमीचा उपसा

मृतसाठ्यातून २१८ दलघमीचा उपसा

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यातून आतापर्यंत २१८ दलघमीचा उपसा करण्यात आला आहे. मृतसाठ्यातून अजूनही १६० दलघमी पाणी उपसा करणे शक्य आहे. उद्योग आणि पिण्याची रोजची गरज आणि बाष्पीभवनाचे प्रमाण पाहता जुलैअखेरपर्यंत हे पाणी सहज पुरू शकेल इतके आहे. वेळेत पाऊस न झाल्यास जुलैअखेर मात्र पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली आहे.
जायकवाडी धरणावर औरंगाबाद आणि जालना शहरांसह लहान-मोठ्या जवळपास २५० गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. याशिवाय औरंगाबाद आणि जालना येथील उद्योगांसाठीही या धरणातून पाणीपुरवठा होतो. या सर्वांसाठी जायकवाडी धरणातून रोज ०.२७ दलघमी इतके पाणी उचलले जाते, तर बाष्पीभवनामुळे धरणातील जवळपास १ दलघमी पाणी रोज वाफेच्या स्वरूपात हवेत उडून जाते. जायकवाडी धरणातील जिवंत साठा यंदा २८ मार्च रोजीच संपला. तेव्हापासून उद्योग आणि शहरांसाठी मृतसाठ्यातून पाणी उपसा सुरू आहे. परभणी, बीड आणि जालना जिल्ह्यांतील काही गावांसाठीही मृतसाठ्यातूनच खाली पिण्याकरिता पाणी सोडण्यात आले. आतापर्यंत धरणाच्या मृतसाठ्यातून तब्बल २१८ दलघमी इतका पाण्याचा वापर झाला आहे. जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्याची क्षमता ७३८ दलघमी इतकी आहे. त्यादृष्टीने धरणात अजूनही ५१९ दलघमी इतके पाणी शिल्लक आहे. मात्र, गाळाच्या प्रमाणाचा विचार करता हा साठा ४०० दलघमीच्याच जवळपास आहे. औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जायकवाडी मृतसाठ्यातून कॅनॉलच्या पातळीपर्यंतच पाणी उपसा करणे शक्य आहे. म्हणजे मृतसाठ्यातून जास्तीत जास्त ३८५ दलघमीपर्यंतच पाणी उचलणे शक्य होणार आहे. आतापर्यंत त्यातील २१८ दलघमी पाणी उचलले गेले आहे. त्यामुळे आता १६० दलघमीइतकेच पाणी उचलता येणार आहे. हे पाणी जुलैअखेरपर्यंत पुरेल. त्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही, असा दावा कडाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
आणखी तीन महिने अडचण नाही
जायकवाडीच्या मृतसाठ्यातून पूर्णक्षमतेने पाणी उचलण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात आली आहे. सध्या जायकवाडीतील मृतसाठ्याची पातळी ४५३ मीटरपर्यंत पोहोचली आहे. वेळेत पाऊस झाला नाही तरीदेखील पुढील ९० दिवसांपर्यंत शहराच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
- अविक बिस्वास, मुख्य जनसंपर्क अधिकारी, वॉटर युटिलिटी कंपनी
पाणीपातळी रोज २ दलघमीने खालावतेय
सध्या जायकवाडीतील पाणी पातळी रोज दोन दलघमीने खाली जात आहे. मृतसाठ्यातून अजून १६० दलघमी पाणी उपसा करणे शक्य आहे. रोजचा वापर, गाळाचे प्रमाण याचा विचार करता ३१ जुलैपर्यंत धरणातील पाणी सहज पुरेल. - जे. एन. हिरे, उपअभियंता, कडा

Web Title: 218 Dalhmi paws from the dead body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.