२१ संस्थांच्या मागविल्या मतदार याद्या
By Admin | Updated: October 21, 2014 00:56 IST2014-10-21T00:27:06+5:302014-10-21T00:56:40+5:30
कळंब : मुदत संपून मोठा कालावधी लोटला तरी तालुक्यातील अनेक सहकारी संस्थाचा कारभार विद्यमान संचालक मंडळ पाहत होते

२१ संस्थांच्या मागविल्या मतदार याद्या
कळंब : मुदत संपून मोठा कालावधी लोटला तरी तालुक्यातील अनेक सहकारी संस्थाचा कारभार विद्यमान संचालक मंडळ पाहत होते. अशा संस्थांच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यासाठी सहकार विभागाने पावले उचलली असून, खामसवाडी, आवाडशिरपुरा यासह २१ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची प्रारुप मतदार यादी निश्चित करण्यासाठी सहाय्यक निबंधक कार्यालयाने संबंधित संस्थाकडून मतदार याद्या मागविण्यात आल्या आहेत.
कळंब तालुक्यातील ग्रामीण भागात सहकारी चळवळ चांगलीच रुजलेली आहे. तालुक्यात विविध उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या, विविध प्रवर्गातील ३५९ नोंदणीकृत सहकारी संस्था आहेत. या संस्थाचे कामकाज व व्यवस्थापन पाहणाऱ्या संचालक मंडळाची मुदत पाच वर्षाची असली तरी खुद्द सहकार विभागच संभ्रमात असल्याने असंख्य संस्थाची मुदत संपली तरी पंचर्वािर्षक निवडणूक घेण्यात आलेली नव्हती. निवडणूक कार्यक्रमच जाहीर नसल्याने या संस्थाचा कारभार अद्यापपर्यंत जुनीच मंडळी बिनबोभाटपणे पाहत होती.
यातही सहकार कायद्यात केंद्राने केलेल्या सुधारणामुळे महाराष्ट्रात सहकारी संस्थांच्या आदर्श पोटनियमात अनेक बदल झाले. राज्यस्तरावरही सहकारी संस्थाच्या निवडणुका घेण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात आले. तद्नंतर लोकसभा व नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक या सर्व गोष्टीमुळे या संस्थाच्या निवडणुकाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. विद्यमान संचालक मंडळीलाही यामुळे आयतेच कोलीत मिळाले असल्याने कोणीही या संस्थांची निवडणूक घ्या, अशी मागणी करत नव्हते. परंतु आता या मुदत संपलेल्या संस्था सहकार विभागाच्या रडारवर असणार असून, या संस्थांची निवडणूक कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
३१ आॅक्टोबर अर्हता दिनांक
याच अनुषंगाने कळंब येथील सहाय्यक निबंधक कार्यालयाने तालुक्यातील सर्वात मोठा आर्थिक उलाढाल खामसवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेसह हावरगाव, गौरगाव, आढळा, आवाडशिरपुरा, येरमाळा, एकूरगा, जवळा (खु), सांैदणा अंबा, कन्हेरवाडी, भाटशिरपुरा, भोसा, माळकरंजा, हिंगणगाव, वडगाव (शि), बहुला, निपाणी, गोविंदपूर, बोरगाव (ध), ढोराळा, हसेगाव (के) या २१ ठिकाणच्या सेवा संस्थांकडून मतदार याद्या मागविल्या आहेत. यासाठी ३१ आॅक्टोबर २०१४ ही अर्हता दिनांक निश्चित करण्यात आली असून, यातील बहुतांश संस्थाचा संचालक मंडळाची मुदत एप्रिल २०१४ पूर्वीच संपलेली आहे. (वार्ताहर)