२१ ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखणार
By Admin | Updated: September 6, 2014 00:26 IST2014-09-05T00:06:59+5:302014-09-06T00:26:09+5:30
सेनगाव : २१ कामचुकार ग्रामसेवकांची एक वार्षिक वेतनवाढ बंद करण्याच्या कारवाईसाठी शिफारस केली आहे.

२१ ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखणार
सेनगाव : तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या २१ कामचुकार ग्रामसेवकांची एक वार्षिक वेतनवाढ बंद करण्याच्या कारवाईसाठी सेनगाव पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी पंकज राठोड यांनी तशी शिफारस जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही.बनसोडे यांना केली आहे.
वारंवार तोंडी, लेखी सुचना देवूनही तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या २१ ग्रामसेवकांनी ‘प्रिया सॉफ्ट’ संगणक प्रणालीमध्ये एप्रिल २०१४ पासून जमा खर्चाची एकही नोंद केली नाही. संगणकीकृत आठ मॉडेल अकांऊटचे अहवाल पंचायत समिती स्तरावर सादर केले नसून अभिलेख अद्ययावत ठेवले नाहीत. एन. बी. यु व एम. आर. ई. जी. एस. योजनेंतर्गत शौचालय बांधकामाचे प्रस्तावही सादर केले नाहीत. शतकोटी वृक्ष लागवड योजनेत आजपर्यंत एकाही रोपाची लावगड केली गेली नाही. रोहयोचे प्रलंबित इ. मस्टर विहित नमुन्यात सादर न करणे, ग्रा. पं. कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह खाते क्रमांकासह माहिती प्रलंबित ठेवणे यासह अन्य कामात कसूर केली आहे. (वार्ताहर)
आता आदेशाची प्रतीक्षा
सेनगाव तालुक्यातील ग्रामसेवकांना वारंवार मासिक आढावा बैठकामध्ये सुचना देवूनही ते कर्तव्यात कसूर करीत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
प्रभारी गटविकास अधिकारी पंकज राठोड यांनी कामचुकारपणा करणाऱ्या ग्रामसेवकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.
कामाविषयीच्या तक्रारी आल्यानंतर सुचना देऊनही सुधारणा न झाल्याने २१ ग्रामसेवकांची एक वार्र्षिक वेतनवाढ एका वर्षासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कामचुकार ग्रामसेवकांवर कारवाई करण्यासाठी पंचायत समितीने गावनिहाय ग्रामसेवकांची यादी व तसा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे यांच्याकडे पाठविला आहे.
प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून याची गंभीरतेने दखल घेत संबंधितांच्या वेतनवाढी रोखण्याचा निर्णय घेतल्याने या कारवाईमुळे कामचुकार ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहे.