२१ शेतकऱ्यांनी घेतला योजनेचा लाभ
By Admin | Updated: July 23, 2014 00:33 IST2014-07-23T00:09:06+5:302014-07-23T00:33:00+5:30
उस्मानाबाद : महावितरण कंपनीने जाहीर केलेल्या कृषी संजीवनी २०१४ योजनेला लातूर परिमंडलात प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे.

२१ शेतकऱ्यांनी घेतला योजनेचा लाभ
उस्मानाबाद : महावितरण कंपनीने जाहीर केलेल्या कृषी संजीवनी २०१४ योजनेला लातूर परिमंडलात प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. कळंब उपविभागातील २१ शेतकऱ्यांनी जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यातच एकरकमी ५० टक्के निव्वळ थकबाकी भरून योजनेचा लाभ घेतला आहे.
वर्षोगणती नियमितपणे वीजबिले न भरल्यामुळे लातूर परिमंडलात कृषिपंपाची थकबाकी १५०० कोटीच्या वर पोहोचली आहे. या थकबाकीतून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व यापुढे नियमितपणे वीजबिले भरण्याची सवय लावण्यासाठी महावितरणने कृषी संजीवनी २०१४ योजना आणली आहे.
या योजनेअंतर्गत कळंब तालुक्यातील गौर येथील गवळी बंधूनी सर्वप्रथम ५० टक्के रक्कम भरली. त्याबद्दल दहिफळचे कनिष्ठ अभियंता चंद्रकांत जाधव व तत्कालिन उपकार्यकारी अभियंता एन. आर. खान यांनी गवळी बंधूचा गौरव केल्याने गौर येथील अन्य प्रभू गवळी, वसंत अंधारे, दत्तात्रय देशमुख, रमेश धोंगडे, मुकुंद देशमुख यांनीही या योजनेचा लाभ घेतला. त्यांचाही महावितरणच्या वतीने गौरव करण्यात आला. त्यामुळे परिसरातील मंगरुळ येथील उर्मिला जयंत कुंभार व विठ्ठल सुडके यांनीही एकरकमी ५० टक्के रक्कम भरली. खामसवाडी येथील इंदू रामा सोनवणे, कन्हेरवाडीचे मारुती कवडे, माळकरंजा येथील दिनकर जाधव, परमेश्वर लोमटे तसेच तालुक्यातील बाळासाहेब गायकवाड, बजरंग शिंदे, राजेंद्र कसपटे, किरण आडसूळ, भास्कर आडसूळ, शशीकला भानुदास या शेतकऱ्यांनीही या योजनेत सहभाग नोंदविला. (प्रतिनिधी)
अशी आहे कृषी संजीवनी योजना
शासनाच्या कृषी संजीवनी २०१४ या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्याकडील निव्वळ थकबाकीच्या ५० टक्के रक्कम भरावयाची आहे. त्यासाठीही तीन हप्ते पाडून देण्यात आले आहेत. आॅगस्टपर्यंत ५० टक्के एकरकमी भरता येतील. अन्यथा आॅगस्टमध्ये २० टक्के निव्वळ थकबाकी भरल्यास सप्टेंबरमध्ये २० व आॅक्टोबरमध्ये १० टक्के या प्रमाणे रक्कम भरावयाची आहे. दंड व व्याजाची रक्कम महावितरणकडून माफ केली जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी ५० टक्के निव्वळ थकबाकी भरल्यास उर्वरित ५० टक्के रक्कम शासनाकडून महावितरणला मिळणार आहे.