राज्यात २००८ संस्थांची गेली ‘पत’, कष्टाचे कोट्यवधी अडकले; लाखो ठेवीदारांचा जीव टांगणीला
By विकास राऊत | Updated: March 4, 2025 06:03 IST2025-03-04T06:01:48+5:302025-03-04T06:03:56+5:30
किती रक्कम अडकली याची मोजदाद अजून सुरूच, किती पैसे परत मिळतील; मिळतीलही की नाही या चिंतेने काळीज ग्रासले

राज्यात २००८ संस्थांची गेली ‘पत’, कष्टाचे कोट्यवधी अडकले; लाखो ठेवीदारांचा जीव टांगणीला
विकास राऊत, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : युनोने २०२५ हे वर्ष ‘सहकार वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. असे असताना राज्यातील अवसायनात निघालेल्या सहकारी पतसंस्थांचा आकडा वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आजघडीला राज्यात २००८ पतसंस्था अवसायनात निघाल्या असून, यामुळे लाखो ठेवीदारांचा जीव टांगणीला लागला आहे. आर्थिक ‘पत’ गेलेल्या संस्थांमधून किती रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत, याचे विश्लेषण सहकार आयुक्तालयात सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पै न पै जमा करून पतसंस्थांमध्ये पिग्मीद्वारे भरणा केलेली रक्कम असू देत किंवा एफडी केलेली असू दे, अनेक ठेवीदारांची रक्कम अवसायनात निघालेल्या पतसंस्थांमध्ये अडकून पडली आहे. ही रक्कम केव्हा मिळणार, हे अद्याप स्पष्ट नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श सहकारी पतसंस्थेत २४ हजार ठेवीदारांची २०२ कोटींची रक्कम अडकल्याचे उदाहरण वानगीदाखल घेता येईल. राज्यातील सहा प्रशासकीय विभागांचा धांडोळा घेतला तर
प्रत्येक विभागात सहकारी पतसंस्था बुडीत निघण्याचे आकडे डोळे दीपवणारे आहेत.
राज्यात जळगाव आघाडीवर
जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक १७४ पतसंस्था बुडीत निघाल्या आहेत. त्या खालोखाल कोल्हापूर १५८, सोलापूर ११६ तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १०२ पतसंस्थांची पत गेली आहे. नागपूर आणि मुंबई-३ भागात एकही पतसंस्था अवसायनात निघालेली नाही.
ठेवीदारांना अपेक्षा
मागील महिन्यात शिर्डी येथे सहकार परिषद झाली. त्यात अवसायनातील पतसंस्थांबाबत चिंतन झाले. या चिंतनातून ठेवींची रक्कम मिळण्याच्या दिशेने पाऊल पडावे, अशी नागरिकांना अपेक्षा आहे.
ठेवीदारांच्या रकमेचे विश्लेषण : ठेवीदारांची किती रक्कम अडकलेली आहे, याचे विश्लेषण सुरू असल्याचे सहकार आयुक्तालय सूत्रांनी सांगितले. मार्चनंतर निश्चित आकडा समोर येईल.
विभागनिहाय किती बुडीत पतसंस्था?
नाशिक ४३७
कोल्हापूर ३१६
पुणे २१३
लातूर २११
मुंबई १८९
अमरावती १७६
छ. संभाजीनगर १६३
कोकण १६१
नागपूर १४२