२००० ‘प्लेटलेटस’च्या रूग्णास जीवदान
By Admin | Updated: November 8, 2014 23:37 IST2014-11-08T23:29:10+5:302014-11-08T23:37:23+5:30
हिंगोली : नाममात्र २००० प्लेटलेट राहिलेल्या रूग्णास एकही रक्ताची बॅग व प्लेटलेट न देता त्याला जीवदान देण्यात हिंगोलीच्या डॉक्टरांना यश आले आहे.

२००० ‘प्लेटलेटस’च्या रूग्णास जीवदान
हिंगोली : नाममात्र २००० प्लेटलेट राहिलेल्या रूग्णास एकही रक्ताची बॅग व प्लेटलेट न देता त्याला जीवदान देण्यात हिंगोलीच्या डॉक्टरांना यश आले आहे. विशेषत: नांदेडातील नामांकित रूग्णालयात उपचारासोबतच औरंगाबादेत ‘बोन मॅरो’ची तपासणी करूनही हताश झालेल्या या रूग्णास हिंगोलीत जीवदान मिळाल्याने डॉक्टरांचे कौतुक होत आहे. शिवाय दर्जेदार सुविधा आणि खात्रिशीर उपचारासाठी जिल्ह्यातून परजिल्ह्यात जाऊन खिसा रिकामा करणाऱ्या रूग्णांचा समज या उपचाराने खोटा ठरवला आहे.
जिल्ह्यात मागील अडीच महिन्यापांसून तापाची साथ आटोक्यात आलेली नाही. त्यात हिंगोली तालुक्यातील सिरसम येथील संभाजीअप्पा घोडेकर (वय ४८) यांना तापाने घेरले. ती आटोक्यात न आल्याने त्यांनी नांदेड गाठले. मोठ्या आशेने नामांकित रूग्णालयात उपचार घेऊ लागले; परंतु प्रकृती सुधारण्याऐवजी बिघडत जाऊ लागली. तब्येतीत सुधारणा होत नसल्याने येथील डॉक्टरांनी प्लेटलेटस्च्या दोन बॅग चढवल्या. तरीही घोडेकर यांच्या स्वास्थ्यावर तीळमात्र फरक पडला नाही. म्हणून योग्य निदानासाठी औरंगाबाद गाठून बोन मॅरोची तपासणी केली. एकीकडे पाण्यासारखा पैसा जात असताना दुसरीकडे आरोग्य जाग्यावर आले नाही. उपचारासाठी नांदेडसारख्या ठिकाणी पंधरवडा घातल्यानंतर खालावलेल्या प्रकृतीसह गावी परतले. शेवटी एकाच्या सल्ल्यावरून हिंगोलीतील रूग्णालयात गेले. विविध ठिकाणी उपचार घेऊन अर्धा महिना घातल्यानंतर घोडेकर यांनी उपचारासाठी तयारी दर्शविली पण खात्रीच्या इलाजाबाबत विश्वास नव्हता. पाहताक्षणी डॉ. अशोक गिरी यांनी रूग्णाच्या प्लेटलेटस्ची तपासणी केली. २००० पर्यंत प्लेटलेटस्खाली आल्याचे पाहून उपचाराबाबत डॉक्टरही संभ्रमात पडले. तत्काळ तापीचे प्रतिजैवके व हिवताप प्रतिबंधक औषधी सुरू केली. योग्य आहार आणि उपचारांत बदल केला. दरम्यान, वेळोवेळी लक्ष देऊन उपचार धीर दिल्याने घोडेकर यांना हळूहळू बरे वाटायला लागले. २ हजारांवरून प्लेटलेटस् वाढत जाऊन १ लाखांचा आकडा ओलांडल्याचे डॉ. सोफिया खान यांनी सांगितले. शेवटच्या तपासणीत तब्बल १ लाख १९ हजारावर प्लेटलेट गेल्याने घोडेकर शुक्रवारी ठणठणीत झाले.(प्रतिनिधी)