बोनसचे २०० कोटी बाजारात
By Admin | Updated: October 20, 2016 01:48 IST2016-10-20T01:24:26+5:302016-10-20T01:48:24+5:30
औरंगाबाद : दुष्काळाचे मळभ दूर झाल्याने यंदाची दिवाळी औद्योगिक कामगारांसाठी उत्साहवर्धक आणि आनंद द्विगुणित करणारी ठरणार आहे.

बोनसचे २०० कोटी बाजारात
औरंगाबाद : दुष्काळाचे मळभ दूर झाल्याने यंदाची दिवाळी औद्योगिक कामगारांसाठी उत्साहवर्धक आणि आनंद द्विगुणित करणारी ठरणार आहे. ४,५०० लहान-मोठ्या उद्योगांमधील सुमारे दोन लाख कामगारांच्या खिशात पगारासह बोनसचा पैसाही खुळखुळणार आहे. सुमारे १७५ ते २०० कोटी रुपयांचा बोनस कष्टकऱ्यांच्या हाती पडणार आहे.
औरंगाबादेतील वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, पैठण, रेल्वेस्टेशन या औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांना बोनस वाटपास सुरुवात झाली आहे.
उद्योगाची गेल्या आर्थिक वर्षातील उलाढाल आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनानुसार औद्योगिक क्षेत्रात बोनसचे वाटप केले जाते. मोठे उद्योग समूह ८.३३ टक्के या दराने, तर लघु-मध्यम उद्योग (पान २ वर)
गेल्या चार वर्षांपासून मराठवाडा दुष्काळाच्या खाईत सापडला होता. गेल्या वर्षी उन्हाळ्यात मद्यनिर्मिती उद्योगांसाठी ६० टक्के, तर इतर उद्योगांसाठी २० टक्के पाणी कपात करण्यात आली होती. परिणामी उत्पादनात घट होऊन औद्योगिक क्षेत्रावर उदासीनतेचे सावट पसरले होते.
बजाज आॅटोसारख्या विभागातील सर्वांत मोठ्या उद्योगाने पाच दिवसांचा आठवडा करून पाणी वापराचे काटकसरीने नियोजन केले होते. यंदा वरुणराजाने मराठवाड्यावर कृपादृष्टी केल्याने दुष्काळाचे मळभ दूर झाले आहे.
जायकवाडी धरणात ८० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाल्याने औद्योगिक पाणीपुरवठ्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे. यामुळे औद्योगिक वसाहतीत उत्साहाचे वातावरण आहे. कंपनीची गेल्या वर्षीची उलाढाल, कामगारांची कामगिरी या आधारावर बोनसचे सूत्र ठरत असल्याने समाधानकारक पावसाचा परिणाम पुढील वर्षीच्या बोनसमधून दिसून येईल, असे उद्योजकांना वाटते.