छत्रपती संभाजीनगर : शहराला तूर्त ७५ एमएलडी अतिरिक्त पाणी मिळावे, या उद्देशाने आठ महिन्यांपूर्वी जायकवाडी ते फारोळ्यापर्यंत ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. जलवाहिनीच्या कामात अनेक तांत्रिक दोष असून, गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह आहे. अनेक ठिकाणी जलवाहिनीला गळती आहे. डागडुजीचे काम अत्यंत थातूरमातूरपणे होत आहे. या कामाचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ऑडिट करणे गरजेचे आहे.
नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होण्यापूर्वी शहराला तूर्त मुबलक पाणी मिळावे, यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकायला लावली. जलवाहिनीसाठी डीआय पाइपचा वापर करण्यात आला. एक पाइप दुसऱ्या पाइपमध्ये अडकविणे एवढेच काम होते. हे कामसुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने योग्य झालेले नाही. जिथे मातीचा थर चांगला नाही, तेथे सिमेंटचे पीसीसी करणे, जलवाहिनीचे पाइप निखळू नयेत, म्हणून काही ठिकाणी सिमेंट काँक्रीटचा सपोर्ट देणे इ. कामे केलेली नाहीत. जलवाहिनीच्या आजूबाजूची माती काढली, तर पाइप आपोआप निखळून बाहेर येत आहेत. मजीप्रा अधिकाऱ्यांनी कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे. भविष्यात ही जलवाहिनी मनपाकडे हस्तांतरित केल्यास डागडुजीचा खर्च बराच वाढेल. हस्तांतरणापूर्वी या कामाचे संपूर्ण ऑडिट करणे गरजेचे आहे.
तज्ज्ञ असूनही गलथानपणा...महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही पाणीपुरवठ्यातील तज्ज्ञ संस्था आहे. गेवराई गावाजवळ ९०० मिमी जलवाहिनीला लीकेज होते. हे लीकेज बंद करण्यासाठी तीन आठवड्यांपूर्वी कंत्राटदार आणि पीएमसीने पाणीपुरवठा सुरू असताना लीकेजच्या ठिकाणी सिमेंट काँक्रीट टाकले. हे लीकेज नंतर बंद झालेच नाही. जलवाहिनी सुरू असताना अशा पद्धतीने गळती बंद होणारच नाही, हे अडाणी व्यक्तीही सांगू शकते.
१०० टक्के वापर सुरू झाला, तर...जलवाहिनीतून ७५ एमएलडी पाणी आणायला सुरू केले, तर जलवाहिनी किती ठिकाणी फुटेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जायकवाडीत या जलवाहिनीसाठी ३,७०० हॉर्स पॉवरचा पंप नुकताच बसविला. लवकरच त्याची चाचणी होईल. त्यानंतर कंत्राटदाराच्या कामाची गुणवत्ता लक्षात येईल.