कीटकजन्य आजारात २० गावे जोखमीची
By Admin | Updated: March 13, 2016 14:24 IST2016-03-13T14:22:21+5:302016-03-13T14:24:27+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील २० गावे किटकजन्य आजारांबाबत जोखमीची आहेत.

कीटकजन्य आजारात २० गावे जोखमीची
हिंगोली : जिल्ह्यातील २० गावे किटकजन्य आजारांबाबत जोखमीची आहेत. या गावांत वर्षभर विविध उपक्रम किंवा मनरेगात डासमुक्ती अभियान राबविण्यास गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्याचे जिल्हा हिवताप विभागाकडून सांगण्यात आले आहे.
यात हिंगोलीमध्ये फाळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कनेरगाव नाका, आडगाव मुटकुळे तर भांडेगाव केंद्रांंतर्गत बासंबा, इंचा या गावांचा समावेश आहे. वसमतमध्ये गिरगाव केंद्रांतर्गत माळवटा, सोमठाणा, हट्टा केंद्रांतर्गत करंजाळा, चिखली तर कळमनुरीमध्ये डोंगरकडा केंद्रांतर्गत वारंगा, चिखली (जुनी), वाकोडी केंद्रांतर्गत वाई तर मसोड केंद्रांतर्गत सेलसुरा, रामेश्वर केंद्रांतर्गत दांडेगाव ही गावे जोखमीची आहेत. औंढ्यात पिंपळदरी केंद्रांतर्गत पिंपळदरी, काकडदाभा, शिरडशहापूर केंद्रांतर्गत माथा, जवळा बाजार केंद्रांतर्गत वडद तर सेनगाव तालुक्यातील गोरेगावसह या केंद्रांतर्गत माझोड, कवठा आरोग्य केंद्रांतर्गत वटकळी या गावांची निवड केली आहे. जिल्हाभरात एकूण ७११ गावे असून २४ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २०१५ मध्ये हिवतापासाठी ७० हजार ७७६ प्रत्यक्ष तर अप्रत्यक्ष ६३ हजार ४८६ असे एकूण १ लाख ३४ हजार २६२ रक्तनमुने तपासणीसाठी नांदेड येथील प्रयोगशाळेकडे पाठविले होते. यापैकी ३ नमुने हिवताप दूषित आढळले. मात्र वर्षभरात हिवताप, डेंग्यू व इतर कीटकजन्य आजाराच्या उद्रेकाने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे हिवताप कार्यालयाचे म्हणणे आहे. जोखमीच्या गावांत तापाचे रुग्ण आढळल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांनी भेटी देवून जलद ताप रुग्ण सर्वेक्षण, नियमित कीटकशास्त्रीय कंटेनर सर्वेक्षण करायचे आहे. इडीस डासआळी आढळल्यास १०० टक्के घरांना भेटी देवून टेमिफॉस फवारणी करीत आहेत. त्यामुळे डासांची उत्पत्ती थांबण्यास मदत झाली. डासोत्पत्ती वाढल्यास पाण्यात जळालेले आॅईल, रॉकेल, वंगण अथवा गप्पी मासे सोडावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी केले आहे.
निवडलेल्या गावात मनरेगात शोष खड्डे घेवून डासांची उत्पत्ती थांबवून त्या गावात पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे. रस्त्यावर खड्ड्यांत साचणारे पाणीही साठणार नाही. जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी गटविकास अधिकाऱ्यांना ही कामे करण्यास सांगितले. तर एक दिवस तरी कोरडा पाळणे गरजेचे आहे.