आवक २० हजार क्विंटलवर, भाव मात्र स्थिरच !
By Admin | Updated: December 25, 2016 23:46 IST2016-12-25T23:45:12+5:302016-12-25T23:46:53+5:30
लातूर : लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसह खाजगी खरेदी केंद्रावर सोयाबीनची आवक हजारो क्विंटलवर आहे़

आवक २० हजार क्विंटलवर, भाव मात्र स्थिरच !
लातूर : लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसह खाजगी खरेदी केंद्रावर सोयाबीनची आवक हजारो क्विंटलवर आहे़ मात्र, महिनाभरापासून दर स्थिरावल्याने शेतकऱ्यांच्या पदरी मशागतीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे़ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शनिवारी १७ हजार क्विंटलची आवक असून उच्चांकी दर २ हजार ९७१ रूपये प्रतिक्विंटलचा आहे़
पावसामुळे नदीकाठच्या अनेक गावातील हजारो हेक्टरवरील सोयाबीनमध्ये पाणी शिरले तर काही ठिकाणी पाण्यामुळे सोयाबीन काळे पडले होते़ शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीपासून ते काढणीपर्यंतचा एकरी खर्च बेरीज केल्यास सध्या मिळणाऱ्या दरातून छदाम उरत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे़ त्यातही नोटबंदीमुळे बाजारपेठेवर परिणाम झाला आहे़ शेतकऱ्यांना नगदी पैसे हवे असतील तर काही ठिकाणी व्यापारी कमी दराने शेतीमाल घेत आहेत़ लातूर जिल्ह्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा करण्यात आला होता़ चांगला पाऊस झाल्याने काही ठिकाणी उत्पन्न भरघोस झाले तर काही ठिकाणी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाहीत़ अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ४ हजार रूपये तरी दर मिळणे अपेक्षित असताना दोन महिन्यांपासून दर स्थिरालेले आहेत़ परिणामी, शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे़ लातूरच्या बाजार समितीत गेल्या आठ दिवसांपासून १५ ते २० हजार क्विंटलपर्यंत सोयाबीन येत आहे़