२० हजार क्विंटल तूर शिल्लक

By Admin | Updated: June 15, 2017 00:16 IST2017-06-15T00:13:53+5:302017-06-15T00:16:49+5:30

नांदेड : जिल्ह्यातील विविध खरेदी केंद्रांवर २० हजार क्विंटल तूर शिल्लक असल्याची माहिती हाती आली आहे़

20 thousand quintals of froth left | २० हजार क्विंटल तूर शिल्लक

२० हजार क्विंटल तूर शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : केंद्र शासनाच्या आदेशानुसार नाफेडला देण्यात आलेल्या १० जूनपर्यंतच्या मुदतीत एकूण १ लाख ५९ हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. मात्र अजूनही जिल्ह्यातील विविध खरेदी केंद्रांवर २० हजार क्विंटल तूर शिल्लक असल्याची माहिती हाती आली आहे़
खरेदी बंद करण्याबाबत नाफेडला शासनाचे आदेश प्राप्त झाल्यामुळे नाफेडने तूर खरेदी बंद केली आहे. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आजपर्यंत खरेदी केंद्रावर तुरीची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी वाहनांच्या रांगा लावलेल्या असताना अचानक पेरणीच्या तोंडावर १० जूनला खरेदी केंद्र गुंडाळण्यात आल्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले आहेत. शासनाने तूर खरेदीसाठी मुदतवाढ दिल्यास दोन - तीन दिवस पुरेल एवढाच बारदाना उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.
शासनाने शेतकऱ्यांकडील शिल्लक असलेल्या तूर खरेदीबाबत कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे आजपर्यंत पाचवेळेस तुरीची खरेदी मध्येच बंद करुन पुन्हा खरेदीसाठी परवानगी देण्यात आली़ त्यामुळे अजूनही बहुतांश शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक आहे़ यासाठी शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या सर्व तुरीची खरेदी झाल्याशिवाय केंद्र बंद करु नये असाही सूर उमटत आहे़ खरेदी केंद्र बंद केल्यामुळे मंगळवारीही शेतकऱ्यांच्या तुरीची वाहने उभी होती़ शासनाने ५ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल या दराने प्रारंभी जिल्ह्यातील विविध खरेदी केंद्रावर नाफेडमार्फत २२ एप्रिलपर्यंत १ लाख १२ हजार २९८ क्विंटल तुरीची खरेदी केली होती. त्यानंतर पुन्हा टप्याटप्प्याने आजपर्यंत जिल्ह्यातील विविध खरेदी केंद्रावर ६ जूनपर्यंत एकूण १ लाख ५९ हजार क्विंटल तूर खरेदी केली आहे़ हमीभावानुसार अर्धापूर, भोकर, हदगाव, नरंगल व धर्माबाद येथील खरेदी केंद्रावर खरेदी सुरु होती. आता बंद झाल्याने मोठी पंचाईत झाली आहे़ त्यात पावसामुळेही नुकसानीची भीती आहे़

Web Title: 20 thousand quintals of froth left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.