२० लाखांची चोरी; संशयितांची रेखाचित्र तयार
By Admin | Updated: September 5, 2014 00:54 IST2014-09-05T00:33:48+5:302014-09-05T00:54:28+5:30
तीर्थपुरी : येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या २० लाखांच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २२ जणांची चौकशी करून दोन संशयित आरोपींची रेखाचित्रे जारी केली आहेत.

२० लाखांची चोरी; संशयितांची रेखाचित्र तयार
तीर्थपुरी : येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या २० लाखांच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २२ जणांची चौकशी करून दोन संशयित आरोपींची रेखाचित्रे जारी केली आहेत. आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
१ सप्टेंबर रोजी तीर्थपुरी ते अंबड रस्त्यावर खापरदेव हिवरा पाटीजवळ दुपारी २.२० वाजता बँकेची रक्कम घेऊन जाणाऱ्या कारला अडवून चोरट्यांनी शिपाई व रोखपाल यांना मारहाण करून हा ऐवज लंपास केला होता. या प्रकराने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. पोलिस यंत्रणा चार दिवसांपासून आरोपींचा शोध घेतली असली तरी आतापर्यंत त्यात त्यांना अपयश आले आहे.
सुरूवातीच्या दोन दिवसांत कारचालक, शिपाई व रोखपाल यांच्या जबाबातून विसंगती आढळून आली होती. या तिघांनी प्रतिकार का केला नाही, यासाठी कसून चौकशी करण्यात आली.
दरम्यान, या तिघांचे मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबाड यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
पोलिसांनी या तपासासाठी घरफोड्या, चोऱ्या करणाऱ्या २२ आरोपींची कसून चौकशी केली असून त्याद्वारे दोन संशयित आरोपींची रेखाचित्रे जारी करण्यात आली आहेत.
या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून त्यासाठी काही पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. मात्र ४ सप्टेंबरपर्यंत एकही आरोपी अटक झालेला नव्हता. (वार्ताहर)