२ हजार कर्मचाऱ्यांचे १६ दिवसांचे वेतन कपात !
By Admin | Updated: January 4, 2016 00:06 IST2016-01-03T23:39:33+5:302016-01-04T00:06:27+5:30
लातूर : एसटीची सेवा अत्यावश्यक सेवा असून, कुठल्याही परिस्थितीत ती बंद ठेवता येत नाही़ मात्र लातूर जिल्ह्यातील पाचही आगारातील वाहक-चालकांनी

२ हजार कर्मचाऱ्यांचे १६ दिवसांचे वेतन कपात !
लातूर : एसटीची सेवा अत्यावश्यक सेवा असून, कुठल्याही परिस्थितीत ती बंद ठेवता येत नाही़ मात्र लातूर जिल्ह्यातील पाचही आगारातील वाहक-चालकांनी वेतनवाढीसाठी गेल्या महिन्यात दोन दिवस संप पुकारुन ही सेवा विस्कळीत केली होती़ त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासनाने पाचही आगारातील २ हजार वाहक-चालकांचे १६ दिवसांचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे़ यामुळे वाहक-चालक हादरले असून, संपावर गेलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशासनाने तशा नोटिसाही पाठविल्या आहेत़
लातूर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पाच आगार आहेत़ लातूर, औसा, निलंगा, उदगीर आणि अहमदपूर या पाच आगाराचा त्यात समावेश आहे़ या आगारातील १ हजार वाहक व १ हजार चालक डिसेंबर महिन्यात पगारवाढीसाठी १७ व १८ तारखेला संपावर होते़ या कर्मचाऱ्यांनी एकही बस आगारातून बाहेर पडू दिली नव्हती़ त्यामुळे एसटीचे ६८ लाखांचे नुकसान झाले होते़ पूर्ण प्रवासी यंत्रणा विस्कळीत झाली होती़ चालक-वाहकांनी दोन दिवस आगारातच मुक्काम ठोकून बस हालू दिली नव्हती़ त्यामुळे हे नुकसान झाले होते़ दरम्यान, प्रशासनाने पगारवाढीचे आश्वासन दिल्यानंतर बस सेवा सुरळीत झाली़ त्यानंतर आता एसटी प्रशासनाने संपावर गेलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे १६ दिवसांचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे़ संपातील कर्मचाऱ्यांना विभाग नियंत्रकांनी नोटिसा पाठविल्या आहेत़
राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागीय कार्यालयांतर्गत २ हजार वाहक-चालक या संपामध्ये सामिल झाले होते़ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अत्यावश्यक सेवा असल्याच्या सूचना देऊनही वेतनाच्या मागणीसह इतर मागणीसाठी दोन दिवस संप करण्यात आला़ या दोन दिवसासाठी १६ दिवसांचा पगार कपातीचा निर्णय शासनाने घेतला आहे़ या निर्णयानुसार लातूर विभागातील २ हजार वाहक-चालकांचे २१ कोटी रुपये कपात होतील़ या सर्व कर्मचाऱ्यांना लातूरच्या विभाग नियंत्रकांनी नोटिसा पाठविल्या आहेत़
४कामगार संघटनेने पूर्वकल्पना न देता आंदोलन करुन दोन दिवस प्रवाशांना वेठीस धरले़ त्यामुळे एसटी महामंडळाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ शिवाय, एसटीची सेवा अत्यावश्यक सेवेत मोडते़ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना संप करता येत नाही़ याची माहिती असताना देखील वाहक-चालकांनी संप केला़ त्यामुळे शासनाने वेतन कपातीची कारवाई सुरु केली आहे, असे विभाग नियंत्रक डी़ बी़ माने यांनी सांगितले़ या निर्णयानुसार जिल्ह्यातील २ हजार कर्मचाऱ्यांवर वेतन कपातीची कारवाई होणार असल्याचे ते म्हणाले़