चाळीसगाव बोगद्यासाठी २ पर्याय

By Admin | Updated: April 24, 2016 00:17 IST2016-04-24T00:01:51+5:302016-04-24T00:17:26+5:30

औरंगाबाद : बहुचर्चित व बहुप्रतीक्षित चाळीसगाव (औट्रम) घाटात राज्यातील सर्वात मोठा बोगदा तयार करण्यात येणार आहे.

2 options for Chalisgaon bog | चाळीसगाव बोगद्यासाठी २ पर्याय

चाळीसगाव बोगद्यासाठी २ पर्याय

औरंगाबाद : बहुचर्चित व बहुप्रतीक्षित चाळीसगाव (औट्रम) घाटात राज्यातील सर्वात मोठा बोगदा तयार करण्यात येणार आहे. या बोगद्याचे डिझाईन तयार करण्याचे कंत्राट स्वित्झर्लंड येथील अ‍ॅम्बर्ग इंजिनिअरिंग कंपनीला दिले असून, या कंपनीने बोगद्यासाठी दोन पर्याय सुचविले आहेत. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कंपनीचे अधिकारी व इंजिनिअर घाटाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी शहरात येणार आहेत.
सोलापूर- धुळे या ४५२ कि. मी. च्या राष्ट्रीय महामार्गातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे कन्नडजवळील चाळीसगाव घाट होय. येथील डोंगर पोखरून दोन मोठे बोगदे तयार करण्यात येणार आहेत. बोगद्याचे डिझाईन तयार करण्याचे कंत्राट राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण (एनएचएआय) ने स्वित्झर्लंडच्या अ‍ॅम्बर्ग इंजिनिअरिंग कंपनीला दिले. डिसेंबर महिन्यात हे काम देण्यात आले होते. या कंपनीने घाट तयार करण्यासाठी दोन पर्याय सुचविले आहेत. एका पर्यायामध्ये ४ कि. मी. चा बोगदा असेल तर २ कि. मी.चा उड्डाणपुलाचा रस्ता अभयारण्यातून जाईल, यामुळे झाडांची तोड मोठ्या प्रमाणात करावी लागेल. यासाठी आणखी ३ कि. मी. चा मार्ग वाढवून १० कि. मी. चा घाट करण्याचे सुचविण्यात आले आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये रस्त्याच्या खालून बोगदा तयार केल्यास अभयारण्याचे कोणतेच नुकसान होणार नाही, हे सुचविण्यात आले आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की, या पर्यायांवर विचारमंथन करण्यासाठी एनएचएआयची बैठक दिल्ली येथे २६ ते २८ एप्रिलदरम्यान होणार आहे.
पहिला पर्याय...
पूर्वीच्या डिझाईननुसार भांबरवाडी येथून जाणारा बोगदा ७ कि. मी. लांबीचा होता. यात २ कि. मी. च्या पुलाचा समावेश होता.
या पुलासाठी गौताळा अभयारण्यात चार मोठे पिलर उभारावे लागतील. अभयारण्यातील हानी टाळण्यासाठी कंपनीने बोगद्याची लांबी आणखी ३ कि. मी. ने वाढवावी, असे सुचविले आहे. म्हणजे १० कि. मी. चा बोगदा होईल.
दुसरा पर्याय...
सध्या घाटातून वाहतूक जाते त्या रस्त्याखालून बोगदा खोदण्यात येऊ शकतो. रस्त्याच्या १५० ते ३०० फूट खालून बोगदा जाईल. डोंगरातूनच संपूर्ण बोगदा जाणार असल्याने अभयारण्याची कोणतीच हानी होणार नाही, असे या प्रस्तावात म्हटले आहे. हा बोगदा १० ते ११ कि. मी. लांबीचा होऊ शकतो.
मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात एनएचएआयचे अधिकारी, अ‍ॅम्बर्ग कंपनीचे अधिकारी व इंजिनिअर प्रत्यक्षात घाटाची पाहणी करण्यासाठी शहरात येणार आहेत. यानंतर केंद्र सरकारच्या परवानगीनुसार घाटातील बोगद्याचे अंतिम डिझाईन तयार केले जाईल. त्याच वेळी बोगदा तयार करण्यासाठी निविदा काढण्याचे कामही कंपनी करणार आहे. केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर ६ महिन्यांत कंपनी डिझाईन तयार करणार आहे.

Web Title: 2 options for Chalisgaon bog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.