१८ ते ४४ वयोगटातील २ लाख नागरिकांना लसीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:04 IST2021-05-18T04:04:37+5:302021-05-18T04:04:37+5:30
औरंगाबाद : शहरातील १८ ते ४४ वयोगटातील जवळपास २ लाखांहून अधिक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी केंद्र शासनाच्या कोविन ...

१८ ते ४४ वयोगटातील २ लाख नागरिकांना लसीची प्रतीक्षा
औरंगाबाद : शहरातील १८ ते ४४ वयोगटातील जवळपास २ लाखांहून अधिक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी केंद्र शासनाच्या कोविन ॲपवर रजिस्ट्रेशन केले. मात्र, त्यांना स्लॉट मिळाले नाहीत. राज्य शासनाने या वयोगटाचे लसीकरणच बंद करून टाकले. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून लसीकरण कधी सुरू होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
१ मेपासून राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. या लसीकरण मोहिमेला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. कोविन ॲपवर नोंदणी केलेल्यांनाच लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला काही दिवस प्रत्येक केंद्रावर फक्त १०० नागरिकांनाच लस देण्यात आली. त्यानंतर ही संख्या २०० पर्यंत नेण्यात आली. नोंदणीसाठी रात्री ८.३० वाजता कोविन ॲप सुरू करण्यात येत होते. अवघ्या ३० सेकंदांमध्ये एका केंद्रावरील नोंदणी पूर्ण होत होती. अनेक नागरिक दररोज रात्री प्रयत्न करीत होते. हजारो नागरिकांना स्लॉटच मिळत नव्हता. अवघ्या दहा ते बारा दिवसांनंतर शासनाने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणात बंद करून टाकले. औरंगाबाद शहरात या वयोगटात मोडणाऱ्या नागरिकांची संख्या जवळपास पाच लाखांहून अधिक असेल असा अंदाज आहे.
शासन आदेशानुसार निर्णय
कोविन ॲपनुसार लसीकरण करावे असे निर्देश शासनाने दिले होते. त्यादृष्टीने शहरात ६ केंद्रे उघडण्यात आली. प्रत्येक केंद्रावर दररोज २०० नागरिकांना लस देण्यात येत होती. लस साठा कमी असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने अचानक या वयोगटातील लसीकरण मोहीम बंद केली. शासनाचा पुढील आदेश आल्यानंतर लसीकरण मोहीम सुरू होईल.
डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा