२ लाखांची बॅग केली परत
By Admin | Updated: July 24, 2014 00:11 IST2014-07-23T23:43:32+5:302014-07-24T00:11:12+5:30
लातूर : शहरातील एका प्रसिद्ध भूलतज्ज्ञाची १ लाख ९० हजार रुपये असलेली बॅग कपड्याच्या दुकानदाराने पोलिसांच्या स्वाधीन केली. गांधी चौक पोलिसांनी या दुकानदाराच्या प्रामाणिकपणाचे बुधवारी कौतुकही केले.

२ लाखांची बॅग केली परत
लातूर : शहरातील एका प्रसिद्ध भूलतज्ज्ञाची १ लाख ९० हजार रुपये असलेली बॅग कपड्याच्या दुकानदाराने पोलिसांच्या स्वाधीन केली. गांधी चौक पोलिसांनी या दुकानदाराच्या प्रामाणिकपणाचे बुधवारी कौतुकही केले.
लातूर शहरातील प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ. राजेश शहा काही कामानिमित्त राजर्षी शाहू महाविद्यालयातील राऊत रुग्णालयात आले होते. रुग्णालयासमोर कार पार्किंग करून ते रुग्णालयात गेले. कारचालकही डॉक्टरांबरोबर गेला. या संधीचा फायदा घेत कोणीतरी अज्ञाताने ही १ लाख ९० हजार रुपये ठेवलेली बॅग कारमधून लंपास केली आणि लातूर जनरल स्टोअर्ससमोरील फुटपाथवर कपड्याचा व्यवसाय करणाऱ्या मोमीन अब्दुल गफार यांच्या स्टॉलच्या बाजूला नेऊन ठेवली. अचानक मोमीन गफार यांचे त्या बॅगेकडे लक्ष गेले. त्यांनी स्टॉलवर आलेल्या ग्राहकांकडे विचारणा केली. परंतु, बॅग आपली असल्याचे कोणीही सांगितले नाही. त्यामुळे त्यांनी बुधवारी ११ वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्रांच्या मदतीने ही बॅग गांधी चौक पोलिसांच्या स्वाधीन केली आणि पोलिसांनी डॉ. शहा यांना त्यांची बॅग परत केली. (प्रतिनिधी)