१९ वर्षांपासून ‘मोंढा स्थलांतरा’चा ‘खेळखंडोबा’
By Admin | Updated: October 20, 2016 01:46 IST2016-10-20T01:21:00+5:302016-10-20T01:46:30+5:30
प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद मोंढ्यातील होलसेल व्यवहाराचे जाधववाडीत स्थलांतर करण्यासाठी कृउबा समिती १९ वर्षांपासून कारवाई करीत आहे. मात्र, अजूनही मोंढ्याचे स्थलांतर होऊ शकले नाही

१९ वर्षांपासून ‘मोंढा स्थलांतरा’चा ‘खेळखंडोबा’
प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद
मोंढ्यातील होलसेल व्यवहाराचे जाधववाडीत स्थलांतर करण्यासाठी कृउबा समिती १९ वर्षांपासून कारवाई करीत आहे. मात्र, अजूनही मोंढ्याचे स्थलांतर होऊ शकले नाही. ११ महिने ‘स्थलांतरा’चा मुद्दा थंडबस्त्यात असतो आणि ऐन दिवाळीच्या तोंडावर स्थलांतराची कारवाई सुरूकरण्यात येते. तणाव निर्माण होतो, चर्चा होते, दोन, तीन दिवस वर्तमानपत्रात बातम्या छापून येतात, यानंतर ‘वाटाघाटी’ होतात आणि दिवाळीत अन्नधान्याची शहरात टंचाई होऊ नये, असे गोंडस कारण सांगून कारवाई थांबविली जाते. ती पुढच्या दिवाळीपर्यंत... यामुळेच ‘स्थलांतरा’चा ‘खेळखंडोबा’ झाला आहे.
मोंढ्यातील जागा कमी पडत असल्याने व वाहतूक जाम होत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीने जाधववाडीत ७३.२८ हेक्टर जमीन संपादित केली. शेतकऱ्यांची जमीन शासनामार्फत घेऊन तेथे भव्य बाजार संकुल उभारले. आजघडीला धान्य मार्केटच्या ५ सेल हॉलमध्ये मिळून १२६ दुकाने, फळेभाजीपाला मार्केटमध्ये २१७ दुकाने, जनरल शॉपिंग सेंटरमध्ये ४०० दुकाने, ४२ शॉप कम गोदाम, २७ गोदामांचे बांधकाम करण्यात आले. १९९७-९८ या वर्षी जुन्या मोंढ्यातील अडत व्यवहाराचे जाधववाडीत स्थलांतर करण्यात आले. त्यावेळेस शेतीनियमित मालाची होलसेल व्यवहार जुन्या मोंढ्यातच राहिले. तेव्हापासून मोंढा स्थलांतराचा मुद्दा रेंगाळत पडला आहे. जाधववाडीतील अडत व्यापाऱ्यांनी तेव्हापासून मोंढ्यातील होलसेल व्यवसायाचे स्थलांतर करावे, अशी मागणी लावून धरली आहे. यासंदर्भात काही अडत व्यापारी न्यायालयातही गेले आहेत. तेथे याचिका प्रलंबित आहे. दरम्यानच्या काळात शहर चोहोबाजूने वाढले आणि आज जुना मोंढा शहराच्या मध्यवस्तीत आला आहे. मोंढ्यात दिवाळीत दररोज ४ ते ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल होते. याच काळात मोंढा स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर येतो. कृउबावर लोकनियुक्त संचालक मंडळ असो वा शासनाने नेमलेला प्रशासक दरवर्षी दिवाळीत मोंढा स्थलांतराचा ‘खेळ’ खेळला जात आहे. या ‘खेळात’ अनेक ‘अर्थ’कारण दडले आहे. यामुळे हा ‘खेळ’ कधीच संपू नये, अशी काहींची इच्छा असल्यानेच या स्थलांतराचा ‘खेळखंडोबा’ झाला आहे.
स्थलांतरात पोलीस विभागाची उडी
दरवर्षी मोंढा स्थलांतर करण्यासाठी पोलीस बंदोबस्तासाठी बाजार समितीतर्फे पोलीस आयुक्तांना पत्र दिले जाते. त्यानुसार कारवाईच्या वेळी पोलीस बंदोबस्त दिला जातो. मात्र, यंदा खुद्द पोलीस आयुक्तांनीच ‘स्थलांतराच्या मुद्यावर’ मोंढ्यात उडी घेतली. मोंढ्यातील जड मालवाहतुकीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, यामुळे पोलीस आयुक्तांनी व्यापाऱ्यांना मोंढ्यात जड वाहने आणण्यास मज्जाव केला होता. ‘स्थलांतराला यंदा वाहतुकीला अडथळा’ हा मुद्दाही जोडला गेल्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य अधिकच वाढले.
समन्वयाचा अभाव
सत्ताधारी काँग्रेस व विरोधी भाजप यांच्यात कृउबा समिती ‘विभागल्या’ गेली आहे. मोंढा स्थलांतरप्रश्नी संचालक मंडळात उभी फूट पडली आहे. काँग्रेसचे सभापती व सहकारी संचालक मोंढा स्थलांतरासाठी प्रयत्न करीत आहेत, तर भाजपचे उपसभापती भागचंद ठोंबरे व अन्य संचालकांनी दिवाळीपर्यंत मोंढ्यात कारवाई होऊ नये, यासाठी पोलीस आयुक्तांना साकडे घातले.