अठरा वर्षांपासून ‘एक गाव एक गणपती’
By Admin | Updated: August 31, 2014 01:09 IST2014-08-31T01:02:55+5:302014-08-31T01:09:23+5:30
पारगाव : वाशी तालुक्यातील हातोला गावात गेल्या अठरा वर्षांपासून ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. यंदाही ही परंपरा कायम असून,

अठरा वर्षांपासून ‘एक गाव एक गणपती’
पारगाव : वाशी तालुक्यातील हातोला गावात गेल्या अठरा वर्षांपासून ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. यंदाही ही परंपरा कायम असून, गणेशोत्सव कालावधीत गणेश मंडळाच्या वतीने विविध मान्यवरांच्या व्याख्यांनासोबतच पाच वर्षांपासून वृक्ष लागवडीबाबत जनजागृतीचेही कार्य करण्यात येत आहे.
पारगावपासून पाच किमी अंतरावर चार हजार लोकवस्तीचे हे गाव आहे. शेती हा गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय. गावात हरिनाम सप्ताह, महापुरूषांच्या जयंती, गणेशोत्सव या कालावधीत ग्रामस्थांसोबतच राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही राजकीय वाद बाजुला ठेऊन एकत्रित येतात. येथील तरूणांनी अठरा वर्षांपूर्वी ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. ती आजही कायम आहे. राजा शिवछत्रपती गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम राबविली जातात. यात अनेक मान्यवरांच्या व्याख्यानांसोबतच विद्यार्थ्यांसाठी नृत्य, रांगोळी, क्रीडा, वर्क्तृत्व, महिलांसाठी पाककला आदी स्पर्धा घेतल्या जातात. स्पर्धेतील विजेत्यांना गणेश विसर्जनाच्या दिवशी बक्षीस म्हणून रोपट्यांचे वाटप केले जाते. तसेच पुढच्या वर्षी या वृक्षाचे संगोपन करणाऱ्यास प्रोत्साहनपर पारितोषिक म्हणून रोख रक्कमही दिली जाते. यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांमध्येही वृक्ष लागवड करून त्याची जोपासणा करण्याची आवड निर्माण झाली आहे. याशिवाय गावात उल्लेखनिय काम करणाऱ्यांना मंडळाच्या वतीने दरवर्षी ‘हातोला रत्न’ हा पुरस्कार देऊन सन्मान होतो. त्यामुळे सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. (वार्ताहर)
मंडळाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबाबत बोलताना संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब खवले म्हणाले, पर्यावरण संवर्धनासाठी हे गणेश मंडळ आग्रही असून, आजपर्यंत मंडळाच्या वतीने अडीच हजार रोपांचे वाटप करण्यात आले आहे. यातील दोन हजारावर वृक्षांचे चांगल्या प्रकारे संवर्धनही झाले आहे. हा उपक्रम यापुढेही चालूच ठेवला जाणार आहे. या मंडळाच्या माध्यमातून अठरापगड जातीला एकत्रित आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे खवले यांनी सांगितले.