१.८४ कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा फेटाळला
By Admin | Updated: July 24, 2014 00:39 IST2014-07-24T00:28:29+5:302014-07-24T00:39:44+5:30
औरंगाबाद : तेंदूपत्ता गोदामाला आग लागल्यामुळे झालेल्या नुकसानीपोटी विमा कंपनीविरुद्ध दाखल १ कोटी ८४ लाख ८९ हजार रुपयांचा भरपाईचा दावा राज्य ग्राहक आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाने खारीज केला.

१.८४ कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा फेटाळला
औरंगाबाद : तेंदूपत्ता ठेवण्यात आलेल्या चारपैकी एका गोदामाला आग लागल्यामुळे झालेल्या नुकसानीपोटी विमा कंपनीविरुद्ध दाखल केलेला १ कोटी ८४ लाख ८९ हजार रुपयांचा नुकसानभरपाईचा दावा राज्य ग्राहक आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाने खारीज केला.
अर्जदार डी. रामा किशन गंगाराम आणि अडेपू आनंद (दोघेही रा. आंध्र प्रदेश) यांनी महाराष्ट्र वनविभागाकडून राज्यातील तेंदूपत्ता जमा करण्याचा ठेका घेतला होता. हा तेंदूपत्ता त्यांनी परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील चार गोदामांमध्ये ठेवला होता. युनायटेड इंडिया विमा कंपनीकडून प्रत्येक गोदामाचा विमा उतरवला होता. एका गोदामाला ८ नोव्हेंबर २०११ रोजी आग लागून त्यातील तेंदूपत्ता जळाला. त्यामुळे अर्जदारांनी विमा कंपनीकडे २९ लाख ६० हजार रुपये, ३७ लाख ६५ हजार रुपये आणि १ कोटी १७ लाख ६४ हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी, म्हणून दावा दाखल केला. हा दावा विमा कंपनीने फेटाळला. घटना महाराष्ट्रातील असल्याने विमा कंपनीने राष्ट्रीय आयोगासमोर याबाबत हरकत घेतली तेव्हा हा दावा राज्य ग्राहक आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे वर्ग करण्यात आला. खंडपीठाचे न्यायिक सदस्य न्या. एस. एम. शेमबोले आणि सदस्य उमा एस.बोरा यांच्यासमोर या दाव्यावर सुनावणी झाली. विमा कंपनीतर्फे अॅड. सुधीर कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला की, चारपैकी एकाच गोदामाला आग लावण्यात आल्याचा अहवाल तज्ज्ञ सर्वेअरने दिलेला आहे. त्यामुळे हा दावा फे टाळण्यात यावा. तो न्यायालयाने मान्य केला.