१८२६ शाळा पिछाडीवरच
By Admin | Updated: January 26, 2017 00:06 IST2017-01-26T00:05:40+5:302017-01-26T00:06:02+5:30
बीड : भौतिक सुविधांसोबतच शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.

१८२६ शाळा पिछाडीवरच
बीड : भौतिक सुविधांसोबतच शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. मात्र, जिल्ह्यातील अडीच हजारपैकी आणखी १८०० हून अधिक शाळा पिछाडीवरच आहेत. या शाळा जलद गतीने प्रगतीपथावर आणण्यासाठी आता अप्रगत शाळांमधील शिक्षकांना प्रगत शाळांमध्ये भेटी देणे अनिवार्य केले आहे. आगामी दोन महिन्यांत सर्वच शाळा प्रगतशील करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद प्रशासन जोमाने कामाला लागले आहे.
विद्यार्थ्यांना हसत- खेळत शिक्षण देणे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अध्यापन सुलभ करणे व विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण होईल या दृष्टीने उपाय करणे असा प्रगत शाळांमागील हेतू आहे. शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचे नाव आता जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र असे केले आहे. अप्रगत शाळा लवकरात लवकर प्रगत शाळांच्या रांगेत आणून ठेवण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत.
त्यानुषंगाने २२ जानेवारी रोजी माजलगाव, गेवराई या तालुक्यांतील अप्रगत शाळांमधील शिक्षकांनी प्रगत शाळांना भेटी दिल्या आहेत. आता उर्वरित तालुक्यांमध्येही रविवारी अप्रगत शाळांचे शिक्षक प्रगत शाळांमध्ये जाऊन त्यांनी केलेल्या उपायांची माहिती जाणून घेणार आहेत. त्यानुसार आपल्या शाळेतही उपक्रम राबविले जणार आहेत. लोकसहभाग व उपलब्ध शासन निधीतून भौतिक सुविधांत वाढ केली जाणार आहे.
दरम्यान, प्रगत झालेल्या शाळांना ‘शाळा सिद्धी’ या पोर्टलवर स्वयं-मूल्यमापन करावयाचे असून, त्यानंतर आॅनलाईन नोंद करावयाची आहे. (प्रतिनिधी)