घाटीत टप्प्याटप्प्यात वापरणार १८ व्हेंटिलेटर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:06 IST2021-06-09T04:06:43+5:302021-06-09T04:06:43+5:30
औरंगाबाद : रुग्णांना उपचारात जोखीम राहू नये यासाठी घाटी रुग्णालयातील दुरुस्त केलेले १८ व्हेंटिलेटर्ससोबत आपत्कालीन उपयोगासाठी आणखी एक चालू ...

घाटीत टप्प्याटप्प्यात वापरणार १८ व्हेंटिलेटर्स
औरंगाबाद : रुग्णांना उपचारात जोखीम राहू नये यासाठी घाटी रुग्णालयातील दुरुस्त केलेले १८ व्हेंटिलेटर्ससोबत आपत्कालीन उपयोगासाठी आणखी एक चालू व्हेंटिलेटर ठेवून (स्टॅण्डबाय) उपयोगात घेण्याबाबत खंडपीठाने निर्देश दिले. यानुसार आता घाटी प्रशासनाने टप्प्याटप्प्यात हे १८ व्हेंटिलेटर्स वापरण्याची तयारी सुरू केली आहे.
घाटी रुग्णालयात ३ जून रोजी सकाळी आलेल्या दिल्लीतील वरिष्ठ डाॅक्टरांनी दिवसभर व्हेंटिलेटरच्या स्थितीची पाहणी केली. घाटीतील डाॅक्टरांकडून व्हेंटिलेटरची स्थिती जाणून घेतली. व्हेंटिलेटरची पाहणी करताना काही व्हेंटिलेटर्सचे भाग बदलून ते रुग्णांसाठी चालू शकतात का, याचीही पडताळणी करण्यात आली. दुरुस्ती केलेल्या व्हेंटिलेटरची चाचणी घेण्यात आली. यासाठी शुक्रवारी रात्रीपासून काही व्हेंटिलेटर्स चाचणीसाठी लावण्यात आले.
दिल्लीहून आलेले हे वरिष्ठ डाॅक्टर्स व्हेंटिलेटर घाटीला प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष ते रुग्णांसाठी वापरताना आलेल्या अडचणी, घाटीतील तज्ज्ञांनी दिलेला अहवाल आणि व्हेंटिलेटर्सच्या एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल देईल, असे घाटीतील डाॅक्टरांमध्ये चर्चा सुरू होती. परंतु, पाहणी होताना नादुरुस्त व्हेंटिलेटर दुरुस्त करण्यात आले. आता हे व्हेंटिलेटर पुन्हा एकदा रुग्णांसाठी वापरण्यात येणार आहे. यापूर्वी इंजिनिअर्सनी दुरुस्त केल्यानंतरही व्हेंटिलेटर चालले नव्हते.
------
प्रशासकीय अधिकारी म्हणाले...
घाटी रुग्णालयात टप्प्याटप्प्याने या व्हेंटिलेटरचा वापर सुरू केला जाईल, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांनी दिली.