१८ हजार लिटरने घटले दूध संकलन
By Admin | Updated: May 7, 2015 00:58 IST2015-05-07T00:35:03+5:302015-05-07T00:58:31+5:30
संजय तिपाले, बीड शेतीला पुरक व्यवसाय म्हणून एकेकाळी भरभराटीला पोहोचलेला दुग्धव्यवसाय आता तोट्यात आला आहे.

१८ हजार लिटरने घटले दूध संकलन
संजय तिपाले, बीड
शेतीला पुरक व्यवसाय म्हणून एकेकाळी भरभराटीला पोहोचलेला दुग्धव्यवसाय आता तोट्यात आला आहे. सततचा दुष्काळ, चाराटंचाई व वाढलेल्या उत्पादनखर्चाने शेतकरी तिहेरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे दूध उत्पादनावर परिणाम झाला असून मागील चार महिन्यात शासकीय व खासगी दूध संकलन केंद्रांत मिळून महिन्याकाठी १८ हजार लिटरची घट झाली आहे.
जिल्हा एकेकाळी दूधउत्पादनात राज्यभर दबदबा ठेवून होता. धवलक्रांतीने शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य तर दिलेच शिवाय आत्मविश्वासही जागविला होता. दुधापासून बनविल्या जाणाऱ्या तूप, दह्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात चार पैसेही खेळू लागले होेते. मात्र, दूधउत्पादनाला समस्यांनी घेरल्याने अनेक शेतकऱ्यांनी दुधाचा धंदा अक्षरश: मोडीत काढला आहे. त्याचा थेट परिणाम दूधसंकलनावर झाला आहे. जानेवारी २०१५ मध्ये शासकीय दूध संकलन केंद्रात ७ हजार ९३६ लिटरने वाढ झाली होती. मात्र, मार्च महिन्याच्या अखेरीस दूध उत्पादनात १६ हजार लिटरपेक्षा अधिक घट झाली. एप्रिल महिन्यात टंचाईची तीव्रता वाढल्याने उत्पादनातील घट १८ हजार लिटरपर्यंत घसरली आहे. चारा, पाण्याची समस्या बिकट बनल्याने जनावरे पोसणे शेतकऱ्यांसाठी तापदायक ठरू लागले आहे. त्यामुळे दुभती जनावरे देखील बाजारात मांडली जात असून दावणी ओस पडू लागल्याचे निराशाजनक चित्र आहे.