तंत्र प्रशालेला मिळणार १८ शिक्षक

By Admin | Updated: March 26, 2015 00:55 IST2015-03-26T00:45:55+5:302015-03-26T00:55:06+5:30

फकिरा देशमुख , भोकरदन प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी राज्यशासनाने सन २००९ - २०१० मध्ये भोकरदन येथे शासकीय तंत्र प्रशाळा केंद्र सुरू केले आहे. मात्र या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी

18 teachers to get technical education | तंत्र प्रशालेला मिळणार १८ शिक्षक

तंत्र प्रशालेला मिळणार १८ शिक्षक

 

फकिरा देशमुख , भोकरदन
प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी राज्यशासनाने सन २००९ - २०१० मध्ये भोकरदन येथे शासकीय तंत्र प्रशाळा केंद्र सुरू केले आहे. मात्र या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांची पदनिर्मितीच करण्यात आली नसल्याने हे तंत्र प्रशाळा केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर होते. याबाबत ‘लोकमत’ने १८ फेबु्रवारी रोजी वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेऊन पदवीधर मतदारसंघाचे आ. सतीश चव्हाण यांनी याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी या तंत्र प्रशालेत पदनिर्मिती करण्याचे आश्वासन दिले.
भोकरदन येथील आय़टी़आय़ इमारतीच्या शेजारी २००८-०९ मध्ये दोन कोटी रूपये खर्च करून भव्य अशा इमारतीचे बांधकाम करून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण घेता यावे म्हणून १ कोटी रूपयाची संगणकासह विविध यंत्रसामुग्रीही उपलब्ध करून दिलेली आहे. या तंत्र प्रशालेमध्ये व्ही़ - २ (टर्नर, फिटर, वेल्डर आदी) व व्ही़- ३ (ईलेक्ट्रीक व ईलेक्ट्रॉनिक्स) हा अभ्यासक्रम शहरातील विविध शाळांमधील ८ वी, ९ वी व १० वी च्या प्रत्येकी ६० विद्यार्र्थ्यांना प्रवेशाची व्यवस्था केली होती. सुरूवातीला दोन वर्ष या शाळेत १८० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.
मात्र या ठिकाणी विद्यार्र्थ्यांना ज्ञान देण्यासाठी किंवा प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षकच नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणची आठवी व नववीची प्रवेश प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. सध्या या शाळेत केवळ ६० विद्यार्थी संख्या आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी पैठण येथून एक निदेशक विद्युत गट जी़ एऩ लांबे यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. ते एकमेव निदेशक या ६० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत. त्यामुळे हे केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर असतानाच लोकमतने याबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेऊन आ. चव्हाण यांनी याबाबत विधानपरिषदेत आवाज उठविल्याने भोकरदन येथील तंत्र प्रशालेस नव संजीवनी मिळणार आहे.
या तंत्र प्रशालेसाठी मुख्याध्यापक ३ पदे, सहाय्यक अधिव्याता ३, निर्देशक ६, कनिष्ठ लिपिक ३, भांडार लिपिक ३ अशा १८ पदांची निर्मिती आराखडा २५ जुलै २००७ च्या आकृतीबंधानुसार नियमित वेतनश्रेणीनुसार करण्यासाठी संचालनालयाने तयार केलेला आहे.
४या प्रस्तावास अद्यापपर्यंत मंजुरी का दिली नाही, असा प्रश्न आ. चव्हाण यांनी विचारला. त्यावर राज्यमंत्री वायकर यांनी हा प्रश्न मार्गी काढण्याचे आश्वासन विधन परिषदेत दिले आहे.
यातंत्र प्रशालेत १८० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची सोय आहे. मात्र शिक्षकांअभावी दोन तुकड्या बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी सध्या ६० विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. येत्या शैक्षणिक वर्षात ही पदे भरल्यास बंद पडलेल्या तुकड्या सुरू होऊन विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार असल्याचे पालक भानुदास भोंबे (आडगाव भोंबे ) , कौतिक कड ,भास्कर बोर्डे (सिपोरा बाजार) यांनी सांगितले.

Web Title: 18 teachers to get technical education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.