विष्णूपुरी जलाशयात १८ टक्के साठा
By Admin | Updated: July 3, 2017 00:36 IST2017-07-03T00:33:55+5:302017-07-03T00:36:04+5:30
नांदेड : विष्णूपुरी जलाशयात रविवारी सकाळी प्रकल्पात १८ टक्के पाणी उपलब्ध झाले असून जलाशयाची पाणीपातळी कासवगतीने वाढत आहे़

विष्णूपुरी जलाशयात १८ टक्के साठा
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : विष्णूपुरी जलाशयात रविवारी सकाळी प्रकल्पात १८ टक्के पाणी उपलब्ध झाले असून जलाशयाची पाणीपातळी कासवगतीने वाढत आहे़ गत दहा दिवसांपासून गोदावरी नदीक्षेत्रात पावसाने दडी मारल्यामुळे जलाशयात पाण्याचा येवा थांबला आहे़ नांदेडची तहान भागविणाऱ्या या प्रकल्पातील साठा समाधानकारक नसल्यामुळे पावसाळ्यातही शहराला दोन दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे़
विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठा तळाला गेल्यामुळे पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले होते़ मे अखेर प्रकल्पात केवळ २ टक्के साठा उपलब्ध होता़ पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी पर्यायी पाणीपुरवठा योजनेचा आधार होता़ मात्र विष्णूपुरी जलाशय कोरडा पडल्याने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते़ यंदा पावसाने मृगात वेळेवर सुरूवात केल्यामुळे विष्णूपुरीतील पाणी झपाट्याने वाढू लागले़ पहिल्या दोन, तीन पावसाने जलाशयात पाण्याचा येवा सुरू झाला होता़ परंतु मागील दहा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने जलाशयातील पाणीपातळी वाढ थांबली आहे़
२२ जून रोजी जलाशयात १४़४७ दलघमी म्हणजे १७ टक्के साठा होता़ त्यानंतर ३० जून रोजी १४़७९ दलघमी म्हणजे १८़ ३१ टक्के पाणी उपलब्ध झाले आहे़ मागील दहा दिवसांत विष्णूपुरी जलाशयातील पाणी पातळीची वाढ पावसाअभावी थांबली आहे़
दरम्यान, समाधानकारक पावसामुळे जूनमध्ये विष्णूपुरी जलाशयात पाण्याचा येवा सुरू झाल्याने महापालिकेने एक दिवसआड पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता़ मात्र अजुनही शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे़ पावसाने दडी मारल्यामुळे पुन्हा शेतकरी चिंतातुर झाले आहेत़ जिल्ह्यात ६० टक्के पेरण्या झाल्या आहेत़ मृगाच्या पावसावर काही ठिकाणी पेरण्या केल्या होत्या़ या पिकांना आता पाण्याची गरज आहे़ अनेक ठिकाणी पिके वाळत आहेत़ आषाढात दमदार पाऊस न पडल्यास दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते, अशी शेतकऱ्यांत चर्चा आहे.