१८ लाखांचा घातला गंडा
By Admin | Updated: October 18, 2016 00:32 IST2016-10-18T00:22:25+5:302016-10-18T00:32:00+5:30
औरंगाबाद : रेल्वेत तिकीट चेकर (टी.सी.) पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिघांची तब्बल १८ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे

१८ लाखांचा घातला गंडा
औरंगाबाद : रेल्वेत तिकीट चेकर (टी.सी.) पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिघांची तब्बल १८ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गौतम शेळके (रा. किन्ही,ता. सोयगाव), सचिन पवार (रा.मयूर पार्क), वेदप्रकाश दुबे (रा. भोपाळ) आणि शैलेश खान (रा. कोलकाता) अशी आरोपींची नावे आहेत. पो.निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी सांगितले की, नारेगावचे रहिवासी सुनील नवघरे हे रिक्षाचालक आहेत. आरोपी गौतम शेळके हा फिर्यादीच्या गावातील रहिवासी आहे. यामुळे त्यांच्यात जुनी ओळख आहे. नवघरे यांची पत्नी बेरोजगार आहे. दोन वर्षांपूर्वी आरोपी शेळके हा नवघरे यांना भेटला आणि तुझ्या पत्नीला रेल्वेमध्ये नोकरी लावू शकतो, त्यासाठी ६ लाख रुपये लागतील, असे सांगितले. गावचा माणूस असल्याने नवघरे यांचा त्याच्यावर विश्वास बसला. आरोपी त्यांच्या घरी गेला. तेथे त्यांच्याकडून आणि भारतभूषण खंदारे, अमोल पवार यांच्याकडून प्रत्येकी ७० हजार रुपये असे एकूण २ लाख १० हजार रुपये घेतले. ही रक्कम परीक्षेचे हॉलतिकीट आणि वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी घेतल्याचे आरोपींनी सांगितले. काही दिवसांनंतर शेळके, पवार आणि दुबे हे तिघे नारेगावातील घरी गेले. तेथे त्यांनी हॉलतिकीट व वैद्यकीय प्रमाणपत्र दिले. उर्वरित रक्कम कोलकाता येथील शैलेश खान यांच्याकडे द्यावी लागेल, असे त्यांनी सांगितले. २०१४ च्या सुरुवातीला १५ लाख ९० हजार रुपये तेथे नेऊन दिले.