१८ कोटींच्या गौण खनिजाची चोरी
By Admin | Updated: July 18, 2014 01:48 IST2014-07-18T00:44:24+5:302014-07-18T01:48:39+5:30
चेतन धनुरे , लातूर महसूल विभागाच्या डोळ्यात धूळफेक करुन खाणमाफियांनी मांडलेला उच्छाद दुर्लक्ष करण्याजोगा नक्कीच नाही़

१८ कोटींच्या गौण खनिजाची चोरी
चेतन धनुरे , लातूर
महसूल विभागाच्या डोळ्यात धूळफेक करुन खाणमाफियांनी मांडलेला उच्छाद दुर्लक्ष करण्याजोगा नक्कीच नाही़ कारण, या माफियांनी कोणताही परवाना न घेता थोडथोडके नव्हे तर सध्याच्या बाजारभावानुसार तब्बल १८ कोटी ४० लाख रुपये किंमतीच्या गौण खनिजाची चोरी केल्याचे उघड झाले आहे़ जिल्ह्यातील १६ अवैध खाणपट्ट्यांतून ही चोरी झाली असून, संबंधित तहसीलदारांनी मात्र कारवाईत अजूनही हात आखडताच घेतला आहे़
जागा स्वत:च्या मालकीची असली तरी त्यातून गौण खनिजाचा उपसा करण्यासाठी खनिकर्म विभागाकडून परवाना घेणे आवश्यक आहे़ मर्यादित क्षेत्रात खोदकाम करण्यासाठी मर्यादित कालावधीचा परवाना हा विभाग देत असतो़ त्यासाठी परवानाधारक खाण पट्टाधारकाकडून गौण खनिज उपश्याच्या प्रमाणात रॉयल्टी भरुन घेण्यात येते़ परंतु, जिल्ह्यातील १६ ठिकाणी खनिकर्म विभागाचा कसलाही परवाना न घेता गौण खनिजाचा बेफाम उपसा केला आहे़ महसूल विभागानेच शोधून काढलेल्या या विनापरवाना खाण पट्ट्यातून तब्बल १ लाख ८३ हजार ९८८ ब्रास गौण खनिजाचा उपसा केला असल्याचे मोजणीअंती स्पष्ट झाले़ या गौण खनिजात प्रामुख्याने दगडाचा समावेश आहे़ सध्याच्या बाजारभावानुसार चोरी झालेल्या या गौण खनिजाची किंमत १८ कोटी ३९ लाख ८८ हजार रुपये इतकी भरते़
उदगीर ही अवैध खाणपट्ट्यांची राजधानीच ठरली आहे़ या तालुक्यात परवानाधारक खाण पट्ट्यांपेक्षा अवैध खाण पट्ट्यांचीच संख्या अधिक आहे़ याठिकाणी केवळ ६ खाण पट्ट्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे़ मात्र कसलाही परवाना न घेता तब्बल ११ खाणपट्टे तयार झाले़ त्यातून तब्बल १ लाख ३६ हजार ८९८ ब्रास गौण खनिजाची चोरी करण्यात आली आहे़ ज्याची किंमत १३ कोटी ६८ लाख ९८ हजार रुपये इतकी आहे़ लातूर तालुक्यातही २ अवैध खाणपट्टे असून तेथून २५ हजार ९९५ ब्रास तर अहमदपूर तालुक्यातील २ अवैध खाणपट्ट्यांतून २१०९५ ब्रास गौण खनिजाची चोरी झाली़ चाकूर तालुक्यातही १ अवैध खाणपट्टा आहे़ मात्र त्यात पाणी असल्याने किती गौण खनिजाचा उपसा झाला, याची मोजणी करता आली नाही़
मोजणीतून प्रकार उघड...
खाण पट्ट्यातून किती ब्रास गौण खनिजाचा उपसा झाला, याची अचूक मोजणी करणारे ‘इटीएस’ तंत्र विकसीत करण्यात आले आहे़ या तंत्राद्वारे जिल्हाधिकारी डॉ़विपीन शर्मा यांनी मराठवाड्यात पहिल्यांदाच लातूरमध्ये मोजणी करुन घेतली़ त्यातून हे गौडबंगाल समोर आले़ आणखीही काही खाणपट्ट्यांची सध्या मोजणी सुरू आहे.
कारवाईस उशीऱ़़
गौण खनिज चोरीप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदारांना कारवाई करण्याचे आदेश दिले़ परंतु, अद्याप एकही कारवाई झाली नाही़ कलम ४८ (७) मधील तरतुदीनुसार गौण खनिज उपसा करणाऱ्यांवर चोरीचा गुन्हा दाखल करीत सध्याच्या बाजारभावानुसार चोरी केलेल्या गौण खनिजाची किंमत काढून त्याच्या तिप्पट दंड आकारण्याचे अधिकारही तहसीलदारांना आहेत़
तहसीलदारांना कारवाईसंदर्भात सूचित करण्यात आले आहे़ अवैध खाणपट्ट्याच्या जागामालकाने हे गौण खनिज उपसले की अन्य कोणाने, याबाबतची पडताळणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे़ एकदा आरोपी निश्चित झाल्यास त्यांच्यावर दंड आकारणीसह गुन्हेही दाखल करण्यात येतील़ - विश्वंभर गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी