१८ इमारती धोकादायक !
By Admin | Updated: November 4, 2014 01:38 IST2014-11-04T00:49:01+5:302014-11-04T01:38:05+5:30
लातूर : येथील जिल्हा परिषदेतील पाच तालुक्याअतंर्गत येणाऱ्या ६ जि़प़ शाळेच्या १२ वर्ग खोल्या व दोन पूर्ण इमारती मोडकळीस आल्या आहेत़

१८ इमारती धोकादायक !
लातूर : येथील जिल्हा परिषदेतील पाच तालुक्याअतंर्गत येणाऱ्या ६ जि़प़ शाळेच्या १२ वर्ग खोल्या व दोन पूर्ण इमारती मोडकळीस आल्या आहेत़ तसेच बोरगावच्या पशुवैद्यकीय दवाखाना, ग्रामपंचायत, अंगणवाड्या, समाजमंदीर यांच्या १८ धोकादायक इमारती असल्याचा तांत्रिक अहवाल सादर करण्यात आला आहे़
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारती पाडण्यास परवानगी मागण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव सादर करण्यात आला़ औसा तालुक्यातील कुलकर्णी तांडा येथील शाळेतील दोन वर्गखोल्या, रेणापूर तालुक्यातील ब्रम्हवाडीच्या शाळेतील एक वर्ग खोली, अंदलगाव शाळेतील दोन वर्गखोल्या जीर्ण झाल्या आहेत. अहमदपूर तालुक्यातील हसरणी शाळेची एक वर्गखोली, हाडोळती शाळेतील चार वर्गखोल्यांसह एकूण १० वर्गखोल्या धोकादायक स्थितीत आहेत.
लातूर तालुक्यातील बोरगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत, अहमदपूर तालुक्यातील थोडगा प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत, लातूर तालुक्यातील शिवणी खुर्द येथील ग्रामपंचायत इमारत, उटी (बु़) येथील २५ वर्षापूर्वी बांधलेली इमारत जीर्ण झाली आहे. तर निलंगा तालुक्यातील लिंबाळा ग्रामपंचायत इमारत ३० वर्षापूर्वीची आहे. या इमारतीचीही स्थिती धोकादायक असून, भिंतींना तडे गेले आहेत. शिवाय, पत्रेही खराब झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या इमारतीला गळती लागते. निलंगा तालुक्यातील धानोरा येथील समाज मंदीरही जीर्ण झाले आहे़ हालसी (हा़) अंगणवाडी इमारत, बसपूर क्रमांक १ अंगणवाडी, शेडोळवाडी अंगणवाडीची इमारत, कासारसिरशी अंगणवाडीची इमारत, औंढ्यातील क्रमांक १ व २ अंगणवाडी इमारत, तांबाळा येथील अंगणवाडी क्रमांक १, २ व ३ च्या इमारती धोकादायक आहेत़ तसेच पिरुपटेल वाडीतील अंगणवाडी इमारत, ताडमुगळी येथील अंगणवाडी क्रमांक २ ची इमारत, माळेगाव (क) येथील अंगणवाडी क्रमांक १ व २ ची इमारत, सिंगनाळ येथील अंगणवाडीची इमारत, यलमवाडीच्या अंगणवाडीची इमारत धोकादायक बनल्या आहेत.