विद्यापीठातील १७ अधिकाऱ्यांच्या बदल्या
By Admin | Updated: September 14, 2014 00:21 IST2014-09-14T00:14:22+5:302014-09-14T00:21:28+5:30
औरंगाबाद : उपकुलसचिव दर्जाचे ६ आणि अन्य ११ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

विद्यापीठातील १७ अधिकाऱ्यांच्या बदल्या
औरंगाबाद : उपकुलसचिव दर्जाचे ६ आणि अन्य ११ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करून कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘राजकारणा’चे मूळच छाटण्याचा धाडसी निर्णय शनिवारी रात्री उशिरा घेतला. कुलगुरूंच्या या कारवाईमुळे अनेक वर्षांपासून एकाच जागेवर ठाण मांडून बसलेल्या या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
यासंदर्भात विद्यापीठ सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, ४ जून रोजी डॉ. चोपडे यांनी कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी सलग तीन महिने विद्यापीठातील जवळपास सर्वच शैक्षणिक विभाग, आस्थापना, परीक्षा विभाग व अन्य कार्यालयांत चालणाऱ्या कामकाजाचे बारकाईने निरीक्षण व अभ्यास केला. तेव्हा अनेक अधिकारी व काही प्राध्यापकसुद्धा विद्यापीठात बसून आपले दैनंदिन काम कमी आणि राजकारण जास्त करीत आहेत, तर दुसरीकडे ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा टिकवून ठेवून विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना ते जाणीवपूर्वक खोडा घालण्याचे प्रयत्न करीत आहेत. ही बाब लक्षात आल्यामुळे कुलगुरूंनी स्वच्छ प्रशासन, गतिमान प्रशासन व पारदर्शी प्रशासनासाठी पहिल्या टप्प्यात १७ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करून ते शनिवारी रात्री उशिरा जळगावकडे रवाना झाले. सोमवारी संबंधितांना बदल्यांचे आदेश बजावले जातील.
दुसऱ्या टप्प्यात आणखी काही उपद्रवी अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातील, असे विद्यापीठ सूत्रांकडून समजले आहे. दरम्यान, काही जणांनी बदली रद्द करण्यासाठी राजकीय दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
कोठून कुठे झाली बदली
विद्यापीठातील उपकुलसचिव दर्जाच्या ६ अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढीलप्रमाणे करण्यात आल्या आहेत. (कंसात त्यांचे पूर्वीचे कार्यालय) डॉ. गणेश मंझा (आस्थापना) यांची बदली उस्मानाबाद उपकेंद्र येथे, ईश्वर मंझा यांची बदली विशेष कक्ष, डी.एम. नेटके (परीक्षा विभाग) यांची अकॅडेमिक विभागात, दिलीप भरड (परीक्षा विभाग) यांची सचिवालयात, विष्णू कऱ्हाळे (अकॅडेमिक) यांची आस्थापना विभागात, विजय मोरे (विशेष कक्ष) यांची परीक्षा विभागात बदली करण्यात आली आहे. याशिवाय कुलसचिव कार्यालयातील बी.एन. फड यांची बदली कुलगुरू कार्यालयात व कक्ष अधिकारी हेमलता ठाकरे यांचीही बदली करण्यात आली आहे.