१६८ इच्छुकांच्या मनसेकडून मुलाखती
By Admin | Updated: September 16, 2014 01:37 IST2014-09-16T01:25:30+5:302014-09-16T01:37:11+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यातून मनसेकडून विधानसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या १६८ जणांनी आज औरंगाबादेत मुलाखती दिल्या.

१६८ इच्छुकांच्या मनसेकडून मुलाखती
औरंगाबाद : मराठवाड्यातून मनसेकडून विधानसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या १६८ जणांनी आज औरंगाबादेत मुलाखती दिल्या. यामध्ये चार माजी आमदारांचा समावेश आहे. औरंगाबाद वगळता उर्वरित सातही जिल्ह्यांतील इच्छुकांच्या मुलाखती स्वत: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेतल्या.
शहरातील सागर लॉन येथे आज मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. मुलाखती घेण्यासाठी राज ठाकरे मनसेच्या इतर नेत्यांसह रविवारीच शहरात दाखल झाले होते. सकाळी ११ वाजता मुलाखतींना सुरुवात झाली. आठही जिल्ह्यांतून इच्छुक उमेदवार कार्यकर्त्यांचा फौजफाटा घेऊन येथे पोहोचले होते. त्यामुळे मुलाखतस्थळाच्या बाहेर मोठी गर्दी झाली होती.
सर्वांत आधी उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर एकापाठोपाठ लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना जिल्ह्यांतील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. एकेका मतदारसंघातील इच्छुकांना एकाचवेळी समोर बसवून त्यांना प्रश्न विचारण्यात येत होते.
मुलाखत देणाऱ्यांमध्ये हरिभाऊ लहाने, सुनील धांडे, रोहिदास चव्हाण आणि किसनराव काळे या चार माजी आमदारांचा समावेश होता. याशिवाय जालना जिल्ह्यातील बाबासाहेब आकात, वैजापूर येथून जे. के. जाधव, कन्नडमधून मनसेचे नेते सुभाष पाटील यांनीही मुलाखती दिल्या.