रोहित्र जळाल्याने १६ गावे अंधारात
By Admin | Updated: November 23, 2014 00:23 IST2014-11-23T00:04:00+5:302014-11-23T00:23:00+5:30
आष्टी : परतूर येथील ३३ केव्ही सब स्टेशन मधील ५ एम.व्ही.ए.च्या ट्रान्सफार्मरला शनिवारी अचाकन आग लागल्याने मोठी धावपळ उडाली.

रोहित्र जळाल्याने १६ गावे अंधारात
आष्टी : परतूर येथील ३३ केव्ही सब स्टेशन मधील ५ एम.व्ही.ए.च्या ट्रान्सफार्मरला शनिवारी अचाकन आग लागल्याने मोठी धावपळ उडाली. ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे.
परतूर येथील अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून दीड तासानंतर आग आटोक्यात आणली. शनिवारी आष्टी कार्यालयातील ३३ केव्ही सब स्टेशनमधील एका ५ एम.व्ही.ए.च्या ट्रान्सफार्मरला अचानकपणे आग लागली. या सबस्टेशनला परतूर येथील ३२ केव्ही स्टेशनमधुन वीज पुरवठा केल्या जात असून या ठिकाणी ५ एम.व्ही.ए.चे तीन रोहित्र आहेत. त्याअंतर्गत आष्टीसह ३२ गावांना विजपुरवठा केल्या जातो. यापैकी एका रोहित्रास अचानकपणे आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. कार्यालयातीन कर्मचाऱ्यांनी परतूर येथेील ३२ केव्हीला कळवून संपूर्ण वीज पुरवठा बंद केला. परतूर नगर परिषदेच्या अग्निशामक दल तीन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. या जळालेल्या रोहित्रामध्ये ३७५० लिटर आॅईल होते. याचा प्रसंगी स्फोटही होऊ शकला असता. मात्र प्रसंगावधान राखून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. या रोहित्रावर वाहेगाव, रायगव्हाण, अकोली, ब्राम्हणवाडी, फुलवाडी, आनंदगाव, कोकरीवाडी, ढोळमाळ तांडा, सोपारा, वाहेगाव, पांडे पोखरी, कोकाटे, हादगाव, धामणगाव, आसनगाव आदी १६ गावांना वीज पुरवठा केल्या जातो. दरम्यान या गावांचा वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती उपअभियंता विश्वनाथ लहाने यांनी दिली. घटनास्थळास तहसिलदार, विनोद गुंडमवार, उपअभियंता विश्वनाथ लहाने, सहाय्यक अभियंता नागरे, आष्टीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज गव्हाणे यांनी भेट दिली. याप्रसंगी अग्निशामक दलाचे रवि देशपांडे, अनिल कन्नावे, विजय यांनी शर्थीचे प्रयत्न केले. याप्रसंगी मंठा परतूर महावितरणाचे कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)