हर्सूल-बेगमपुरादरम्यान होणार १५० फुटांचा रस्ता
By Admin | Updated: December 28, 2015 23:48 IST2015-12-28T23:43:20+5:302015-12-28T23:48:38+5:30
औरंगाबाद : सुधारित शहर विकास आराखड्यात जळगाव रोडवरून थेट बेगमपुऱ्याकडे तब्बल दीडशे फूट रुंद रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे.

हर्सूल-बेगमपुरादरम्यान होणार १५० फुटांचा रस्ता
औरंगाबाद : सुधारित शहर विकास आराखड्यात जळगाव रोडवरून थेट बेगमपुऱ्याकडे तब्बल दीडशे फूट रुंद रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. हा रस्ता सावंगी तलावाच्या अलीकडून निघून तो सारा वैभव वसाहत परिसर, मकबऱ्यामार्गे पुढे बेगमपुऱ्यात येईल. या नवीन रस्त्यामुळे शेकडो मालमत्तांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे.
शहराचा सुधारित विकास आराखडा सोमवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेसमोर मांडण्यात आला. यामध्ये पुढील २० वर्षांची गरज लक्षात घेऊन अनेक आरक्षणे टाकण्यात आली आहेत. ही आरक्षणे टाकतानाच वाढती रहदारी नियंत्रित करण्यासाठी काही पर्यायी रस्तेही प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यात हर्सूलमार्गे मकबरा, बेगमपुऱ्याकडे येणाऱ्या रस्त्याचाही समावेश आहे. जळगाव रोडवर सध्या हर्सूल पोलीस ठाणे जिथे आहे, त्याच्या थोडे अलीकडून हा रस्ता सुरू होतो. पुढे तो हर्सूलमधील चेतनानगर, जटवाडा रोड, सारा वैभव वसाहतीजवळून पुढे मकबऱ्यामार्गे बेगपुऱ्यात जातो. हा रस्ता ४५ मीटर म्हणजे तब्बल दीडशे फुटांचा असणार आहे.
सध्या या ठिकाणी अनेक मालमत्ता आहेत. त्यामुळे नवीन रस्त्यामुळे शेकडो मालमत्तांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. या आराखड्यात शहराच्या विकासाचा सर्वंकष विचार करून आरक्षणे टाकण्यात आली आहेत. निवासी वापराची वाढती गरज, सोशल अॅमेनिटीजची आरक्षणे, रस्ते, शासकीय कार्यालयांसाठीच्या जागेची मागणी, गुंठेवारी भाग अशा अनेक बाबींचा यात विचार झाला आहे. निवासी वापरासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन उपलब्ध होणार असल्यामुळे बेकायदा प्लॉटिंगचे उच्चाटन होण्याची शक्यता आहे.