विद्युत प्रवाह जमिनीत उतरून १५ जखमी

By Admin | Updated: July 30, 2014 00:50 IST2014-07-30T00:13:37+5:302014-07-30T00:50:23+5:30

औराद बाऱ्हाळी : तालुक्यातील हल्लाळी येथे विजेच्या उच्च दाबाची तार तुटून लघुदाबाच्या तारेवर पडल्याने १५ गावकऱ्यांना धक्का बसून ते जखमी झाले आहेत़

15 people injured due to electric current | विद्युत प्रवाह जमिनीत उतरून १५ जखमी

विद्युत प्रवाह जमिनीत उतरून १५ जखमी

औराद बाऱ्हाळी : तालुक्यातील हल्लाळी येथे विजेच्या उच्च दाबाची तार तुटून लघुदाबाच्या तारेवर पडल्याने १५ गावकऱ्यांना धक्का बसून ते जखमी झाले आहेत़ याशिवाय, अनेकांच्या घरातील टीव्ही, पंखे जळाले़
हल्लाळी गावात सिंगल फेज सुरु आहे़ त्यावरुन ११०० केव्हीच्या उच्च दाबाची तार गेली आहे़ त्याखाली संरक्षक तार नसल्याने ही तार लघुदाबाच्या तारेवर तुटून पडली़ त्यामुळे गावातील जुन्या तारा ठिकठिकाणी पडल्या़ गावातील बरीचशी घरे पत्र्याची असल्याने याठिकाणी विद्युतप्रवाह संचारला़ त्यातच भीज पाऊस झालेला असल्याने पडलेल्या तारांमुळे जमिनीतही वीजप्रवाह संचारला़ हा प्रकार सुरु असतानाच डीपीला आग लागली़ गावात वीजप्रवाह संचारल्याची ओरड होताच याठिकाणी वसुलीसाठी आलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी तात्काळ संतपूर येथील उपकेंद्रास संपर्क करुन विद्युतप्रवाह खंडीत करण्यास सांगितले़ कुसनूर फिडर बंद करण्यास वेळ लागल्याने तोपर्यंत अनेकांच्या घरातील टीव्ही, पंखे व अन्य उपकरणे जळून खाक झाली़ शिवाय, जमिनीत संचारलेल्या वीजप्रवाहाचा धक्का बसून १५ गावकरी जखमी झाले आहेत़ बरेचजण सतर्क झाल्याने मोठा अनर्थ टळला़ जखमींवर कुसनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले़
दरम्यान, घटनेनंतर येथील शाखा अभियंत्यांनी गावास भेट दिली असता गावकऱ्यांनी जुनी लाईन बदलण्याच्या मागणी करीत त्यांना घेराव घातला़ त्यानंतर सहाय्यक कार्यकारी अभियंता विवेकानंद कोटे यांनी घटनास्थळास भेट देऊन गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले़ गावातील जळालेले मीटर व जुनी लाईन दोन आठवड्यांच्या आत बदलून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले़
यावेळी प्रवीण कारभारी, कोंडिबा बिरादार, महेश कोटे, पंढरीनाथ धामणगावे, साईनाथ माने, सूर्यकांत अजने, दयानंद पाटील, जीवन कारभारी, मनोज बिरादार, नेताजी बिरादार, बाजीराव बिरादार, तानाजी पाटील, शिवाजी अजने, पांडुरंग बिरादार यांची उपस्थिती होती़ (वार्ताहर)
तर मोठा अनर्थ़़़
विद्युत वाहिनी जुनी आहे़ त्यामुळे अनेक ठिकाणच्या लाईन जीर्ण झाल्या आहेत़ उच्च दाबाची विद्युत तार लघु दाबाच्या तारेवर पडल्याने त्यातही उच्च दाब तयार झाला़ त्यामुळे ठिकठिकाणच्या तारा तुटल्या़ घरांतील उपकरणांनाही त्याचा फटका बसला आहे़ ही बाब तात्काळ लक्षात घेऊन फिडर बंद केले नसते तर मोठा अनर्थ घडला असता, अशी माहिती सहाय्यक कार्यकारी अभियंता विवेकानंद कोटे यांनी दिली़

Web Title: 15 people injured due to electric current

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.