जिल्हा बँकेच्या दीड लाख खातेदारांची होईल कर्जमुक्ती
By Admin | Updated: June 6, 2017 00:43 IST2017-06-06T00:41:19+5:302017-06-06T00:43:36+5:30
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या अल्पभूधारकांच्या कर्ज माफ घोषणेचा फायदा बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अखत्यारीतील १ लाख ३६ हजार ४८५ अल्प आणि अत्यल्प भूधारक खातेदारांना होईल

जिल्हा बँकेच्या दीड लाख खातेदारांची होईल कर्जमुक्ती
सतीश जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या अल्पभूधारकांच्या कर्ज माफ घोषणेचा फायदा बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अखत्यारीतील १ लाख ३६ हजार ४८५ अल्प आणि अत्यल्प भूधारक खातेदारांना होईल. त्यांच्यावरील कर्जाचा बोजा जवळपास ४३ हजार ६९२ कोटी रुपयांचा आहे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने शासनास ३१ मार्च २०१७ रोजी पर्यंतची आकडेवारी पाठविली, त्यानुसार या कर्जमाफीचा फायदा वरील शेतकऱ्यांना होणार आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत होता. शेतकरी संपामुळे कर्जमाफीचा हा मुद्दा आणखी तीव्र झाला होता. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात परळी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील अल्प आणि अत्यल्प भूधारकांचे कर्ज माफ केल्याची घोषणा केली होती. बीड जिल्ह्यातील अल्प व अत्यल्प भूधारकांची संख्या आणि त्यांच्यावरील कर्जाचा आढावा घेतला असता वरीलप्रमाणे माहिती मिळाली. हे खातेदार फक्त डीसीसीच्या अखत्यारीतील आहेत. याशिवाय जिल्ह्यामध्ये विविध राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज दिले आहे. या कर्जाची आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही.
या कर्जमाफीचा मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत कमी फायदा होत आहे. मराठवाडा आणि विदर्भात ५ एकरपेक्षा अधिक जमीन असलेल्या खातेदारांची संख्या ही पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक आहे. मराठवाडा आणि विदर्भातील जमीन ही कोरडवाहू अधिक असल्यामुळे बँकांमार्फत पाहिजे तेवढे कर्ज मिळत नाही.
याउलट, पश्चिम महाराष्ट्रात अत्यल्प आणि अल्प भूधारकांची संख्या अधिक असून, ही जमीन बागायती आहे.
मोठ्या प्रमाणावर फळे लागवड असल्यामुळे या खातेदारांना विविध बँकांनी कर्जही मोठ्या प्रमाणावर दिले आहे.