जिल्ह्यातील १५ जिनिंग बंदच!
By Admin | Updated: November 30, 2015 23:30 IST2015-11-30T23:17:11+5:302015-11-30T23:30:16+5:30
जालना : जिल्ह्यात यंदा पडलेल्या अत्यल्प पावसामुळे शेतीचे उत्पादन चक्र पूर्णपणे कोलमडले आहे. शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या कापसाने दगा दिल्याने

जिल्ह्यातील १५ जिनिंग बंदच!
जालना : जिल्ह्यात यंदा पडलेल्या अत्यल्प पावसामुळे शेतीचे उत्पादन चक्र पूर्णपणे कोलमडले आहे. शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या कापसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांसोबतच कापसावर अधारित उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील ३५ पैकी सुमारे १५ जिनिंग बंद असल्याचे चित्र आहे. यामुळे कोट्यवधीच्या उलाढालीवर परिणाम होणार आहे.
जिल्ह्यात ३ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड होते. कापसाचे उत्पादनही बऱ्यापैकी होत होते. गत तीन ते चार वर्षांपासून या उत्पादनात ५० टक्क्यांनी घट आली आहे. याचा थेट परिणाम कापूस जिनिंग वर झाला आहे. ३५ पैकी १० ते १२ जिनिंग कसबशा सुरू झाल्या आहेत.
गतवर्षी एक एकरास ३ क्विंटलचा उतारा झाला होता. साधारणपणे ९ लाख क्विंटलपेक्षा अधिक कापसाचा उतारा आला होता. यंदा हे प्रमाण दोन ते अडीच क्विंटलवर आल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
जिल्ह्यात गतवर्षी ९ लाख क्विंटल कापसाचे उत्पादन निघाले होते.
आठ तालुक्यात मिळून ३५ जिनिंग आहेत.यातील काही जिनिंग कापसाअभावी तर काही जिनिंग इतर कारणामुळे बंद आहेत. यातून कापूस जिनिंग तसेच गाठींची निर्मिती होते. पूर्ण हंगाम जिनिंग व्यवस्थित चालल्यास १ लाख क्विंटल कापसाचे जिनिंग होते.
मराठवाड्यात परिस्थिती बिकट असली तरी इतर ठिकाणी जिनिंग व्यवस्थित सुरू आहेत. मराठवाड्यातील बहुतांशी जिनिंंगची स्थिती नाजूक आहेत. (प्रतिनिधी)
अनेक मजुरांना कापूस हंगाम सुरू झाला की, जिनिंग सुरू होईल, अशी अपेक्षा असती. ही अपेक्षा यंदा फोल ठरली आहे. एका जिनिंगमध्ये अंदाजे ५० मजूर काम करतात. जिनिंग बंदच असल्याने शेकडो मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. यात हेल्पर, फिटर, तंत्रज्ञ आदींचाही समावेश आहे.
याविषयी जिनिंगचालक अनुप गुप्ता म्हणाले की, यावर्षी कापसाच्या उत्पादनात घट आली आली आहे. त्यामुळे बहुतांश जिनिंगवर परिणाम झाला आहे. काही चालकांनी कापसाला योग्य भाव देऊन जिनिंग सुरू केल्या आहेत. जिनिंग पूर्ण हंगाम चालतील अशी आशा नाही. कापसाचे दर परवडत नसल्याने काहींनी जिनिंग बंद ठेवल्या आहेत. जिनिंग व्यवसायातून होणारी आर्थिक उलाढाल मंदावली आहे. इतर राज्यात जिनिंग बऱ्यापैकी सुरू असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.