१४८ पाझर तलावांची चौकशी गुंडाळली
By Admin | Updated: July 18, 2014 01:50 IST2014-07-18T00:30:13+5:302014-07-18T01:50:33+5:30
गंगाराम आढाव , जालना लघु पाटबंधारे विभागाच्या पाझर तलाव व गाव तलावातील कामांमध्ये गैरव्हार झाल्याचे निष्पन्न होऊनही कारवाई झाली नसल्याची बाब समोर आली आहे.

१४८ पाझर तलावांची चौकशी गुंडाळली
गंगाराम आढाव , जालना
२००७ ते २००९ या आर्थिक वर्षात लघु पाटबंधारे विभागाच्या (स्थानिक स्तर) विभागाने रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात केलेल्या पाझर तलाव व गाव तलावातील कामांमध्ये गैरव्हार झाल्याचे निष्पन्न होऊनही त्यासंदर्भात फारसे गांभीर्याने कारवाई झाली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
दरम्यान दोन तलावातील गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर अन्य १४९ पाझर तलावाची चौकशी करण्याचा निर्णय एसीबीने घेतला होता. मात्र तो आता गुंडाळण्यात आल्या असल्याची कबुली खुद्द या खात्यातील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने दिली.
जिल्ह्यात १ एप्रिल २००७ ते २००९ या कालावधीत लघु पाटबंधारे विभागाने रोजगार हमी योजनेतून पाझर तलावासह गाव तलावाची शेकडो कामे हाती घेतली. परंतु तत्कालीन कार्यकारी अभियंता रघुवीर यादव यांच्यासह अन्य सहकारी अभियंत्यांनी या कामांच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणावर हेराफेरी करून शेकडो कामे थातूर-मातूर पद्धतीने करण्यात आली. या कामात मजुरांऐवजी मशिनरींचाच मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. प्रत्यक्षात साईटवरील कामाची स्थिती न पडताळताच संबंधित अभियंत्यांनी परस्परच मोजमाप पुस्तिका लिहून घेतल्या. त्याची बिलेही तयार केली. संबंधित एजन्सीला हाताशी धरून त्या-त्या कामांचे टप्प्या-टप्प्याने कोट्यवधी रुपयांची बिले उकळली.
२००७ ते २००९ तब्बत तीन वर्षे सुरू असलेल्या या प्रकराच्या विरोधात काही ग्रामस्थांनी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी केल्या होत्या. परंतु लघु पाटबंधारे विभागाने एकाही तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे सन २०१० मध्ये खा. रावसाहेब दानवे यांनी अखेर लोकायुक्तांकडेच या संबंधी तक्रार केली होती. त्या आधारे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकायुक्तांच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील पाझर तलाव क्र. ५ व जाफराबाद तालुक्यातील पापळ येथील पाझर तलाव क्र ८ या दोन तलावाच्या कामाची चौकशी केली. त्यात दाभाडी येथील तलावात ४ लाख ६१ हजार,४७८ रूपयाची तर पापळ येथील तलावासाठी ९ लाख ६५ हजार ५७३ रूपये ५३ पैसे एवढी वाढीव रक्कम अदा करून गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार २ मे २०१४ रोजी बदनापूर व टेंभूर्णी पोलिस ठाण्यात या तत्कालीन कार्यकारी अभियंता रघुवीर गणपतराव यादव, तत्कालीन उपविभागीय अभियंता भास्कर काशीनाथ जाधव, तत्कालीन शाखा अभियंता श्रीनिवास बाबाजी काळे, रामेश्वर अंबादास कोरडे (तत्कालीन शाखा अभियंता, जालना, गणेश मजूर सहकारी संस्था भोकरदनचे तत्कालीन चेअरमन सुभाष देशपांडे, वडीगोद्रीच्या गुरूदेव मजूर सहकारी संस्थेचे तत्कालीन चेअरमन राजेंद्र एकनाथ खोमणे व गणेश मजूर सहकारी संस्था तोंडोळीचे ढवळे अशा सात जणांविरूद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. तसेच अभियंत्यांच्या घरांची झडती घेतली होती. यात शाखा अभियंता श्रीनिवास काळे यांच्या घरी १० तोळे ५२ ग्रॅम सोन्याचे दागिने व ६७ हजार रुपये रोख आढळून आले. तर उपअभियंता भास्कर जाधव यांच्या घरात कपाटात ६ किलो ३०० ग्रॅम सोने आढळून आले. या कारवाईत एकूण ३ कोटी ७८ लाखांची मालमत्ता आढळून आली आहे. सदर गैरव्यवहार प्रकरणामुळे जिल्ह्यात झालेल्या १४८ पाझर तलावांच्या कामांचीही चौकशी करण्याचा निर्णय एसीबीने घेतला होता. त्या अनुषंगांने वर्तमान पत्रात वृत्तही प्रकाशित झाले होते. त्यानुसार २० ते १५ पाझर तलावाच्या कामास एसीबी व जिल्हा परिषदेच्या अभियंत्यानी भेटी देऊन पाहणीही केली होती. मात्र चौकशीची कार्यवाही पुढे चालू न ठेवता ती बंद करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दोन कामांच्या चौकशीसाठी दोन वर्षे
या संदर्भात अॅन्टी करप्शन ब्युरोचे पोलिस उपअधीक्षक प्रतापसिंह शिकारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जिल्ह्यातील पाझर तलावाच्या कामांची भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी आहे. हे या दोन कामांच्या चौकशीतून स्पष्ट झाले.
या दोन कामांच्या चौकशीसाठी आमच्या खात्याला दोन वर्षाचा कालावधी लागला. त्यामुळे दीडशे कामांची चौकशी करण्यासाठी किती वर्ष लागेल ? असा सवाल करून दोन पाझर तलावाच्या गैरव्यहार प्रकरणाचा तपास पूर्ण करून दोन गुन्हे दाखल केले. त्यामुळे उर्वरित कामांची चौकशी बंद केली असल्याचे सांगितले.
दाभाडी व पापळ येथील पाझर तलावाच्या कामात प्रत्यक्षात साईटवरील कामाची स्थिती न पडताळताच संबंधित अभियंत्यांनी परस्परच मोजमाप पुस्तिका लिहून घेतल्या. त्याची बिलेही तयार करून गैरव्यवहार केला होता. हे प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जि. प. तांत्रिक विभागाच्या पथकाने केलेल्या चौकशीत उघड झाली.
कोट्यवधीचे घबाड
जालना जिल्ह्यातील ज्या दोन पाझर तलावाच्या कामांची चौकशी एसीबीने केली त्यात दहा लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संबंधित चारही अभियंत्यांच्या घराच्या झडतीत सात किलो सोन्यासह कोट्यवधीची अपसंपदा आढळून आली. त्यामुळेच पाटबंधारे विभागाने जिल्ह्यात केलेल्या १४९ कामांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार काही तलावाच्या कामांची पाहणीही एसीबी व जि.प. च्या तांत्रिक पथकाने संयुक्तपणे केली होती. मात्र त्यानंतर हे प्रकरण थंडबस्त्यात पडले. आता तर ही चौकशीच बंद केल्याचे सांगण्यात आले.