१४५ गावांवर टंचाईचे ढग !

By Admin | Updated: June 26, 2014 23:30 IST2014-06-26T23:30:37+5:302014-06-26T23:30:37+5:30

लातूर : पावसाळ्याचे पहिले नक्षत्र कोरडेच गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अवर्षण प्रवण स्थिती निर्माण झाली आहे.

145 clouds of scarcity clouds! | १४५ गावांवर टंचाईचे ढग !

१४५ गावांवर टंचाईचे ढग !

लातूर : पावसाळ्याचे पहिले नक्षत्र कोरडेच गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अवर्षण प्रवण स्थिती निर्माण झाली आहे. पाणीपुरवठ्याचे जलस्त्रोत जवळपास आटले असल्याने टंचाई आराखड्याच्या शेवटच्या टप्प्यात आता ग्रामस्थांतून पाण्यासाठी ओरड सुरू झाली आहे. जिल्ह्यातील १४५ गावांनी टँकर, अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्याची जोरदार मागणी केली आहे. या मागणीत दररोज नव्या गावांची भर पडू लागली आहे.
शेतकऱ्यांप्रमाणेच सर्वसामान्यांच्याही नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. सबंध जून कोरडाच निघून जात आहे. त्यामुळे पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. महिनाभरापूर्वी जिल्ह्यात केवळ एक टँकर सुरू होता. परंतु, पावसाळ्याच्या तोंडावर टंचाईचे गडद ढग दाटू लागल्याने पाण्यासाठी नागरिकांतून ओरड सुरू झाली आहे. आजघडीला जिल्ह्यात ८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. याशिवाय १३८ विहिरी व विंधन विहिरींचे अधिग्रहण करून १४५ गावांतील नागरिकांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तरीही टंचाईत वरचेवर भर पडत असून, दररोज नव्या गावांचे प्रस्ताव पंचायत समित्यांकडे दाखल होऊ लागले आहेत. तब्बल १४५ गावांतील पाणीपुरवठ्याचे स्त्रोत आटल्याने त्यांना अन्य पर्यायांद्वारे पाणी देण्याची वेळ आली आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता जुलैच्या सुरुवातीसही पाऊस झाला, तरी त्याचा पाणीपुरवठ्यासाठी लगेचच उपयोग होण्याची शक्यता नाही. सतत पाऊस झाल्यास २० जुलैनंतरच पाणीपुरवठ्याचे जलस्त्रोत उपयुक्त ठरतील. त्यामुळे पुढील महिना अडचणीचा असल्याने प्रशासनाकडून टंचाईचा अंदाज घेण्यात येत आहे.
सर्वाधिक पाणीटंचाई लातूर, अहमदपूर व रेणापूर तालुक्यांमध्ये जाणवते आहे. अहमदपूरच्या ३३ गावे व ६ वाड्यांनी अधिग्रहणाद्वारे पाण्याची मागणी केली आहे. लातूर तालुक्यातील ३० गावे व ४ वाड्यांनी, तर रेणापूर तालुक्यातील २८ गावांनी अधिग्रहणाद्वारे पाणी देण्याचे प्रस्ताव सादर केले आहेत. औसा तालुक्यातील १०, निलंगा ९, उदगीर ८, शिरूर अनंतपाळ ४, जळकोट १ व चाकूर तालुक्यातील एका गावाने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव दिले होते. त्यापैकी १११ गाव व वाड्यांवर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. याशिवाय, १३ गाव, वाड्यांनी टँकरद्वारे पाण्याची मागणी केली होती. त्यापैकी ७ गाव, वाड्यांसाठी ८ टँकर सुरू करण्यात आले आहेत.
दरम्यान, लांबलेला पाऊस लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाई कक्षाने नव्याने पाणीटंचाईचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
लातूर तालुक्यात ४ टँकर...
सर्वाधिक टँकर लातूर तालुक्यात सुरु आहेत़ येथील चिंचोली बल्लाळनाथमध्ये २ तर सारसा व रामेगाव तांडा येथे प्रत्येकी एका टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे़ अहमदूपर तालुक्यातील देवकरा व परचंडा गावांनाही टँकरद्वारे पाणी सुरु आहे़ उदगीर तालुक्यातील काशिराम तांडा, सोमला तांडा तर रेणापूर तालुक्यातील गोपाळवाडी येथे टँकर सुरु करण्यात आले आहेत़
टंचाईचा नव्याने आढावा...
पावसाची अशीच परिस्थिती राहिल्यास जुलैमध्ये मोठ्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्याअनुषंगाने सर्व तालुक्यांतून टंचाईचा नव्याने आढावा घेण्यात येत आहे.
जेणेकरून पाणीपुरवठ्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबविता येऊ शकतील, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस. चारथळ यांनी दिली.

Web Title: 145 clouds of scarcity clouds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.