जिल्हा नियोजनासाठी १४४ कोटींचा आराखडा
By Admin | Updated: January 28, 2015 00:56 IST2015-01-28T00:52:21+5:302015-01-28T00:56:41+5:30
लातूर : जिल्हा नियोजनासाठी १४४ कोटींचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून, गतवर्षीपेक्षा यंदा त्यात वाढ करण्यात आली आहे़

जिल्हा नियोजनासाठी १४४ कोटींचा आराखडा
लातूर : जिल्हा नियोजनासाठी १४४ कोटींचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून, गतवर्षीपेक्षा यंदा त्यात वाढ करण्यात आली आहे़ शिवाय, स्वच्छता व पाणीटंचाईसाठी निधीची भरीव तरतुद करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी येथे पत्रपरिषदेत सांगितले़
प्रशासकीय इमारतीतील डीपीडीसीच्या सभागृहात नियोजन समितीची बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, सध्या जिल्ह्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात आहे़ पाणी टंचाईवर कायमचा तोडगा काढण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जाणार आहेत़ सध्या असणाऱ्या पाणीटंचाई संदर्भात एक विशेष बैठक घेऊन टंचाईचे नियोजन केले जाईल़ पाणीसाठा वाढविण्यासाठी वेगवेगळी कामे हाती घेऊन अडचण दूर केली जाईल़ पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मनपाची स्थिती बिकट आहे़ त्यावरही तोडगा काढून टंचाईचे निवारण केले जाईल़ भंडारवाडी प्रकल्पातून पाणी आणण्याचे नियोजन आहे़ त्यासाठी निविदा प्रक्रिया लवकरच हाती घेतली जाणार आहे़ नियोजन समितीने गतवर्षी तरतुद केलेल्या निधीपैकी ९ कोटी रुपयांचा निधी अखर्चीत आहे़ या निधीतून नाला खोलीकरण, नाला सरळीकरण केले जाणार आहे़ त्यासाठी स्वत:ची यंत्रसामुग्री खरेदी केली जाणार आहे़
९ कोटीतून ३ कोटीतून जेसीबी, पोकलेन, टिप्पर असे वाहने खरेदी केली जातील़ या मशिनद्वारे नाला सरळीकर, खोलीकरण केले जाणार असल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले़ स्वच्छता व पाणीटंचाई निवारणासाठी गतवर्षी १३ कोटी निधीची तरतुद होती़ यंदा २२ कोटी ४४ लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे़ लातूर जिल्हा नियोजनातील ९६ टक्के निधी खर्च झाला असून, केवळ ४ टक्के निधी अखर्चीत आहे़ अखर्चित निधी मार्च अखेर खर्च केला जाईल़
उदगीर व जळकोट तालुक्यात पिण्याच्या पाण्यासह पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न आहे़ त्यासंदर्भात नियोजनात तरतुद केली नसली तरी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ पाणीटंचाईच्या विशेष बैठकीत या सर्व प्रश्नांवर तोडगा काढला जाईल, असेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले़
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, आ़डॉ़सुधाकर भालेराव, आ़संभाजी पाटील, आ़विनायकराव पाटील, खा़सुनील गायकवाड यांच्यासह जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, अतिरिक्त जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, जिल्हा पोलिस अधिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, निवासी उपजिल्हा अधिकारी डॉ़विश्वंभर गावंडे आदींची यावेळी उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)
पालमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली नाही़ ठोस निर्णय झाले नाहीत़ निव्वळ मोघम चर्चा झाली असल्याचा आरोप पत्रकारांशी बोलताना जि़प़अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी केला़ कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती व पाझर तलावांसाठी शिल्लक निधीतून ५ कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेने या बैठकीत पालकमंत्र्यांकडे मागितला़ परंतु या प्रश्नांवर निर्णय झाला नाही़ पाणीटंचाई, दुष्काळनिवारण, चाऱ्याचा प्रश्न यावर काहीही ठोस निर्णय झाले नाहीत़ केवळ मोघम चर्चा या बैठकीत झाली़ नियोजन समितीची नूतन पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पहिलीच बैठक झाली़ परंतु ही बैठक समाधानकारक झाली नाही़ समितीच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर केवळ मोघम चर्चा झाली आहे़ निर्णय झाले नाहीत, अशी खंतही जि़प़अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केली़
४कोल्हापूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीला आणि पाझर तलाव घेण्यासाठी शिल्लक निधीतून ५ कोटी रुपये जिल्हा परिषदेला दिले तर कायमस्वरुपी टंचाईचे निवारण होईल़ परंतु जिल्हा परिषदेची ही मागणी गांभीर्याने घेतली नाही़ त्यामुळे नियोजन समितीची बैठक केवळ मोघम चर्चेवर झाली, अशी टिकाही जि़प़ अध्यक्षा कव्हेकर यांनी केली़