विनातिकीट बसमधून प्रवास करणार्यांना आळा बसावा; व एसटीच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी राज्य परिवहन मंडळाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे
१४१ फुकट्या प्रवाशांना दंड
हिंगोली : विनातिकीट बसमधून प्रवास करणार्यांना आळा बसावा; व एसटीच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी राज्य परिवहन मंडळाकडून विशेष खबरदारी घेतली जात असून त्यासाठी राज्यभरातील विविध विभागीय कार्यालयातंर्गत पथकाद्वारे कारवाई करण्यात येते. हिंगोलीसह आठ डेपोचे कामकाज परभणी येथील विभागीय कार्यालयातंर्गत सुरू असून १ एप्रिल ते नोव्हेंबर २0१५ अखेर पथकाने १४१ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्यासह वाहकांकडून २४ हजार ६४ रूपये दंड वसूल केला आहे. एसटीने प्रवास करणार्यांची संख्या जास्त असली तरी, आगाराच्या उत्पन्नात घट होत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे कामचुकार अधिकारी-कर्मचारी तसेच विनातिकीट प्रवास करणारे प्रवाशांमुळे आगारास आर्थिक तोटा सहन करावा लागतो. राज्य परिवहन मंडळाकडून याला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. त्यानुषंगाने विनातिकीट प्रवासी करणारे तसेच दोषी वाहकांवर कारवाई केल्या जात आहे. परभणी विभागीय कार्यालयातंर्गत जवळपास ७00 च्यावर चालक व वाहकांची संख्या आहे. त्यांच्यावर चार पथकाद्वारे नियंत्रण ठेवल्या जात आहे. यासाठी रात्रीच्यावेळी २ तर दोन तर दिवसा दोन पथके कार्यरत असतात. एका पथकात पाच ५ अधिकारी व कर्मचार्यांचा समावेश असणे आवश्यक आहे. परंतु एका पथकामध्ये केवळ तीन अधिकारी-कर्मचार्यांचा सामावेश आहे. परिणामी, कामे गतीने होत नाहीत. ५0 रूपये तिकीट रकमेच्यावर जर एखाद्या प्रवाशाने विनातिकीट बसमधून प्रवास केल्यास त्याला १0२ रूपये दंड व तिकिटाची पूर्ण रक्कम वसूल केल्या जाते. तर वाहकाला कारवाईचे स्वरूप लक्षात घेत दंड तसेच सहा महिने किंवा एका वर्षासाठी सेवेतून काढून टाकल्या जात असल्याची माहिती विभागीय कार्यालयाने दिली. परभणी कार्यालयातंर्गत हिंगोली, पाथरी, कळमनुरी, गंगाखेड, वसमत, परभणी यासह विविध डेपाचा कारभार चालतो. त्यांतर्गत वरीलप्रमाणे कारवाई झाली आहे. (प्रतिनिधी)/ अतिक्रमण काढणार हिंगोली बसस्थानक परिसरातील लवकरच अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. यासंदर्भात पोलिस प्रशासनाकडे २९ डिसेंबर २0१५ रोजी स्थानक परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी संरक्षण मागण्यात आले होते. परंतु ही तारीख पुढे ढकलली असून लवकरच अतिक्रमण हटविले जाणार असल्याची माहिती आगारातील संबधित अधिकार्याने दिली.
विनातिकीट प्रवास करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे प्रवाशांनी विनातिकीट प्रवास न करता त्यांनी राज्य परिवहन मंडळास सहकार्य करावे. तसेच वाहकांनीही याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कर्तव्यावर हजर असताना बसमधील प्रत्येकाला तिकीट देण्याचे काम करणे अपेक्षित आहे. जेणेकरून एसटीच्या उत्पन्नात घट होणार नाही. तसेच प्रवाशांनीही वाहकांकडून आवश्यक अंतराचे तिकीट घेणे बंधनकारक आहे, असे विभागीय वाहतूक अधिकारी डी. बी. कसबे यांनी सांगितले.