रात्रीतून फोडली १४ दुकाने

By Admin | Updated: December 26, 2016 23:57 IST2016-12-26T23:52:06+5:302016-12-26T23:57:33+5:30

उदगीर / देवणी : उदगीर व देवणी शहरातील तब्बल १४ दुकाने एकाच रात्रीतून चोरट्यांनी फोडल्याची घटना सोमवारी पहाटे घडली आहे़

14 shops in the night | रात्रीतून फोडली १४ दुकाने

रात्रीतून फोडली १४ दुकाने

उदगीर / देवणी : उदगीर व देवणी शहरातील तब्बल १४ दुकाने एकाच रात्रीतून चोरट्यांनी फोडल्याची घटना सोमवारी पहाटे घडली आहे़ यात लाखो रुपयांचा ऐवज चोरीस गेला़ एकट्या देवणी शहरातच १० दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य केले़ तर उदगीरच्या मोंड्यातील ४ अडत दुकाने चोरट्यांनी फोडली़ मात्र, येथे चोरट्यांच्या हाती काही लागले नाही़
देवणी शहरातील उदगीर-निलंगा राज्यमार्गापासून ते मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावरील प्रमुख दुकाने चोरट्यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास फोडली़ थंडीचा कडाका वाढल्याचा फायदा उचलत चोरट्यांनी एकापाठोपाठ मुख्य बाजारपेठेत धुमाकूळ घातला़ त्यात प्रामुख्याने ज्वेलरीतून मोठा ऐवज गेला आहे़ फिर्यादी राजकुमार पंचाक्षरे यांचे मुख्य बाजारपेठ लाईनमध्ये ज्वेलरी दुकान आहे़ येथे चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला व दुकानातील साहित्याची तोडफोड करीत ५ किलोग्रॅम वजनाचे चांदीचे मोड, तीन किलोग्रॅम चांदी, मोबाईल व काही रोख असा २ लाख १० हजार रुपयांचा ऐवज पळवून नेला आहे़ त्यापाठोपाठ बस्वराज काळू यांच्या ज्वेलरीतून रोख १० हजार व ५५ हजार रुपयांचे दागिने असा ऐवज ६५ हजार रुपयांचा चोरीस गेला आहे़ महादेव बिरादार यांच्या किराणा दुकानातून रोख ३८०० रुपये चोरीस गेले आहेत़ किशोर बेलुरे यांच्या जनरल स्टोअर्समधून रोख ३० हजार व ३५ हजार रुपयांचे मोबाईल व्हाऊचर्स असा ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला़ रफीक शेख यांच्या मोबाईल दुकानातून १६ हजार रुपये किमतीचे मोबाईल चोरीस गेले आहेत़ महादेव बेलुरे यांच्या किराणा दुकानातून रोख ५ हजार रुपये व १० हजार रुपये किंमतीचे साहित्य असे १५ हजार रुपयांचा मुद्देमाल पळविण्यात आला़ संतोष चिंद्रेवार यांच्या किराणा दुकानातून रोख १० हजार रुपये, अविनाश धनुरे यांच्या कापड दुकानातून १५०० रुपये चोरीस गेले आहेत़
याशिवाय, बाजारपेठेतील श्री साई ज्वेलर्स, श्री ज्वेलर्स, बालाजी ज्वेलर्स, अभिजीत ज्वेलर्स, शिवशक्ती मॉल, तपोवन गिफ्ट सेंटर या दुकानातही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला़ मात्र येथे त्यांच्या हाती काही लागले नाही़ याप्रकरणी देवणी पोलिस ठाण्यात कलम ४५७, ३८०, ४२७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास उपनिरीक्षक एस़एऩ सांगवीकर करीत आहेत़ दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर देवणी पोलिसांनी श्वान पथकास पाचारण करुन त्याद्वारे माग काढण्याचा प्रयत्न केला़ मात्र, शवान राज्यमार्गापर्यंत जाऊन तेथेच घुटमळले़ (वार्ताहर)

Web Title: 14 shops in the night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.