डीसीसीत अडकले शिक्षकांचे १४ कोटी
By Admin | Updated: June 20, 2014 00:44 IST2014-06-19T23:41:29+5:302014-06-20T00:44:51+5:30
बीड: कोट्यवधी रुपयांच्या अपहाराने गोत्यात आलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे १४ कोटी ४० लाख रुपये आजही थकित आहेत़

डीसीसीत अडकले शिक्षकांचे १४ कोटी
बीड: कोट्यवधी रुपयांच्या अपहाराने गोत्यात आलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे १४ कोटी ४० लाख रुपये आजही थकित आहेत़ त्यामुळे शिक्षक अडचणीत आले आहेत़
जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे सप्टेंबर व आॅक्टोबर २०१२ या दोन महिन्यातील भविष्य निर्वाह निधीचे १३ कोटी ६९ लाख १३ हजार ३९१ रुपये जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा होते़ ते अद्यापही शिक्षकांना मिळालेले नाहीत़ याशिवाय पोस्ट खात्याची आरडी, एलआयसी, सेवानिवृत्तांचे वेतन असे मिळून ७० लाख ८० हजार ५८१ रुपये देखील बँकेकडेच आहेत़ ते देखील शिक्षकांना मिळाले नाहीत़ हक्काच्या पुंजीसाठी शिक्षक जिल्हा बँकेमध्ये खेटे मारत आहेत; परंतु बँकेकडून त्यांची हेळसांड होत आहे़ पैसे मिळत नसल्याने शिक्षक हतबल झाले आहेत़ अनेक शिक्षकांच्या पाल्यांची लग्ने, घरांचे बांधकाम रखडले आहेत़
अडवणूक थांबवा
दरम्यान, शिक्षकांसाठी जिल्हा बँकेने ध्येयपूर्ती योजना सुरु केली होती़ कर्जदार शिक्षकांना मुदतीच्या आत नोटिसा धाडून सक्तीने कर्जवसुली करण्यात आली़ आता मात्र, शिक्षकांच्या कष्टाचा पैसा जिल्हा बँक परत करायला तयार नाही़ त्यामुळे शिक्षकांची अडवणूक थांबवून तात्काळ रक्कम परत करावी, अशी मागणी राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र खेडकर, अरुण खुले, जिल्हाध्यक्ष रशीद खान, सचिव दिलीप खाडे, कार्याध्यक्ष सुनील म्हेत्रे, कोषाध्यक्ष शेख रशीद यांनी बँकेचे प्रशासक ज्ञानेश्वर मुकणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे़ आंदोलनाचा इशाराही खेडकर यांनी दिला आहे़ (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेतील शेकडो शिक्षकांचे हाल.
भविष्य निर्वाह निधीचे १३ कोटी ६९ लाख. तर एलआयसीचे ७० लाख ८० हजार रुपये जिल्हा बँकेत आहेत जमा.
वारंवार खेटे घालूनही शिक्षकांच्या पदरी निराशा.
कष्टाचा पैसा अडकल्याने शिक्षकात नाराजी.
पैसे तात्काळ देण्याची शिक्षक संघटनेची मागणी.