आरोग्य केंद्रांसाठी १४ कोटी ७१ लाखांचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:51 IST2017-09-16T00:51:30+5:302017-09-16T00:51:30+5:30
प्रादेशिक अनुशेष दूर करण्याच्या अनुषंगाने २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरीता जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या इमारतीच्या बांधकामासाठी राज्य शासनाने १४ कोटी ७१ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे प्रलंबित राहिलेल्या इमारत बांधकामांना आता सुरुवात होणार आहे.

आरोग्य केंद्रांसाठी १४ कोटी ७१ लाखांचा निधी मंजूर
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : प्रादेशिक अनुशेष दूर करण्याच्या अनुषंगाने २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरीता जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या इमारतीच्या बांधकामासाठी राज्य शासनाने १४ कोटी ७१ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे प्रलंबित राहिलेल्या इमारत बांधकामांना आता सुरुवात होणार आहे.
राज्यातील प्रादेशिक अनुशेष दूर करण्याच्या अनुषंगाने २०१७-१८ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतूद करण्यात आली होती. त्या अनुषंगाने राज्यातील ७ जिल्ह्यांमधील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या ५९ कोटी ५८ लाख रुपयांच्या निधीपैकी ८० टक्के म्हणजेच ४७ कोटी ६६ लाख ४४ हजार रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. या संदर्भातील आदेश १५ सप्टेंबर रोजी काढण्यात आले आहेत. यामध्ये परभणी जिल्ह्यासाठी १५ कोटी ७० लाख ६० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी १४ कोटी ७१ लाख ५० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय नांदेड जिल्ह्यासाठी १ कोटी ८२ लाख रुपयांची मागणी होती. त्यापैकी १ कोटी ७० लाख ५२ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यासाठी ४ कोटी १ हजार रुपयांची मागणी होती. त्यापैकी ३ कोटी ७५ लाख ७० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त सातारा जिल्ह्यासाठी १६ कोटी रुपयांची मागणी होती. त्यापैकी १४ कोटी ९९ लाख ४ हजार रुपये, जळगाव जिल्ह्यासाठी ६ कोटी २२ लाखांच्या मागणीपैकी ५ कोटी ८२ लाख ७५ हजार रुपये, कोल्हापूर जिल्ह्याच्या ७ कोटीच्या मागणीपैकी ६ कोटी ५५ लाख ८३ हजार रुपये व सोलापूर जिल्ह्याच्या ११ लाख ५९ हजार रुपयांपैकी १० लाख ८६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून संबंधित जिल्ह्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या इमारती बांधण्यात येणार आहेत. परभणी जिल्ह्यात ९ आरोग्य केंद्र व ४३ नवीन उपकेंद्र बांधण्यासंदर्भातील प्रस्ताव दोन दिवसांपूर्वी झालेल्या आरोग्य समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.