साबुदाण्याची १३० पोती जप्त
By Admin | Updated: May 8, 2014 00:10 IST2014-05-08T00:10:33+5:302014-05-08T00:10:44+5:30
येरमाळा : ट्रक चालकाचा खून करून मालासह ट्रक पळविल्याच्या घटनेत पोलिसांनी मंगळवारी आणखी एका संशयितासह एक जीपही ताब्यात घेतली

साबुदाण्याची १३० पोती जप्त
येरमाळा : ट्रक चालकाचा खून करून मालासह ट्रक पळविल्याच्या घटनेत पोलिसांनी मंगळवारी आणखी एका संशयितासह एक जीपही ताब्यात घेतली असून, संशयिताच्या घरातून साबुदाण्याची १३० पोती जप्त करण्यात आली आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १ एप्रिलच्या मध्यरात्री सेलम (तामिळनाडू) येथून निघालेला ट्रक चोराखळी पाटीजवळ येताच दरोडेखोरांनी त्यास अडवून चालक व क्लिनरला जबर मारहाण करीत मालासहित ट्रक पळविला होता. दरम्यान, ट्रकमधील दोघांना जबर मारहाण केल्यानंतर या दरोडेखोरांनी त्यांना येडेश्वरी मंदिराच्या पाठीमागे असणार्या पाझर तलावाजवळील विहिरीत टाकून दिले होते. त्यात एकाचा मृत्यू झाला व एकजण वाचला. वाचलेल्या दिनेशकुमार गणेशायन यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. यात ४ मे रोजी उपळाई पाटीनजीक असणार्या हॉटेल दिनेशच्या पाठीमागील खोल्यात छापा टाकत ७० पोती साबुदाणा जप्त केला. तसेच हॉटेल मालक रामभाऊ हारभरे याच्यासह इतर सहा संशयितांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यानंतर सदर संशयितांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी मंगळवारी चोराखळी येथील श्याम साचणे यांच्या घरी छापा टाकला. यावेळी तेथून साबुदाण्याची ६० पोती व एम.एच. २३ टी. १००७ या क्रमांकाची स्कार्पिओ जीप तसेच श्याम साचणे यासही पोलिसांनी ताब्यात घेतले. दिवसेंदिवस या गुन्ह्यातील तपासात नवनवीन गुन्हेगार व चोरीचा माल सापडत आहे. अजूनही काही लोकांना ताब्यात घ्यावयाचे असल्याने या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिसांकडून गुप्तता पाळली जात आहे. (वार्ताहर)