अपंगांच्या १२६ पिठाच्या गिरण्या बंद !

By Admin | Updated: February 5, 2015 00:54 IST2015-02-05T00:47:31+5:302015-02-05T00:54:45+5:30

लातूर : पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने अपंगांना मिनी पिठाच्या गिरण्यांचे वाटप केले आहे. जिल्ह्यातील १३३ अपंगांंना मिनी पिठाच्या गिरण्या दिल्या आहेत.

126-folds of disabled people are closed! | अपंगांच्या १२६ पिठाच्या गिरण्या बंद !

अपंगांच्या १२६ पिठाच्या गिरण्या बंद !



लातूर : पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने अपंगांना मिनी पिठाच्या गिरण्यांचे वाटप केले आहे. जिल्ह्यातील १३३ अपंगांंना मिनी पिठाच्या गिरण्या दिल्या आहेत. मात्र यातील ७ गिरण्यांचा अपवाद वगळता १२६ गिरण्या बंद आहेत. या गिरण्यांतून दळण दळले जात नाही. दळले तर पाळूचा खरडा दळणात येतो. काही गिरण्यांची मोटार काही मिनिटांतच तापून बंद पडते. त्यामुळे लाभार्थी अपंगांच्या या गिरण्या धूळ खात पडून आहेत. ‘असले कसले पुनर्वसन’ असा प्रश्नच या अपंगांनी उपस्थित केला आहे. ‘लोकमत’च्या जिल्ह्यातील वार्ताहरांनी लाभार्थ्यांच्या घरी जाऊन पाहणी केल्याने ही सत्यता समोर आली आहे.
औसा तालुक्यातील नागरसोगा येथील अनिता माळी या अपंग महिलेला वाटप झालेली मिनी पिठाची गिरणी बनावट असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच जिल्हा प्रशासनाने गिरणी बदलून देण्याचे आदेश संबंधित पुरवठा कंपनीला दिले. त्यानुसार कंपनीने बुधवारी नागरसोगा येथे जाऊन पिठाची गिरणी बदलून दिली आहे. परंतु, जिल्ह्यातील अन्य १२६ मिनी पिठाच्या गिरण्या बंद पडल्या आहेत. ज्या ७ गिरण्या चालू आहेत, त्याही एखादा तास चालतात. त्यामुळे या पिठाच्या गिरणीवर व्यवसाय करता येत नाही. घरगुती दळण दळण्यासाठीच उपयोग होतो. प्रत्येक गावात मोठ्या पिठाच्या गिरण्या व्यावसायिकांच्या असल्यामुळे अपंगांना दिलेल्या या मिनी पिठाच्या गिरण्यांचा उपयोग होत नाही. त्यांच्याकडे ग्राहक येतही नाहीत. मग या अपंगांचे या पिठाच्या गिरण्यांतून पुनर्वसन कसे होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ महेश मेघमाळे यांनी सर्व मिनी पिठाच्या गिरण्यांची तपासणी करण्याचे निर्देश समाजकल्याण अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यांचे कर्मचारी जेव्हा तपासणी करायची तेव्हा करतील. परंतु, त्यापूर्वीच ‘लोकमत’च्या जिल्ह्यातील वार्ताहरांनी प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत जाऊन पिठाच्या गिरण्या चालू की बंद, याबाबतची पाहणी केली. या पाहणीत १३३ पैकी केवळ ७ गिरण्या चालू असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याही घरगुती वापरापुरत्याच. घरगुती तरी कसले, जात्यावर बेसण पीठ दळण्यापेक्षा या गिरणीवर दळलेले बरे म्हणूनच या गिरण्यांचा उपयोग या सात अपंगांचा सुरू आहे. उर्वरित १२६ गिरण्या मात्र चालू नाहीत. त्या नादुरुस्त आहेत. त्याचा काहीही फायदा नाही. भंगारात जमा आहेत. त्यामुळे पुनर्वसनाचातर प्रश्नच उद्भवत नाही.
लातूर तालुक्यातील भातांगळीतील विठ्ठल जाधव, बोरीतील नामदेव गोंगडे, टाकळी (सि.) येथील सत्यभामा आगलावे, चिंचोली (ब.) येथील भागिरथीबाई माने, रामेगाव येथील सोपान देडे, खंडाळा येथील अक्षय झाडके, हासोरी येथील निलेश सोनवणे, बोरगाव येथील गोरख आदमाने, वाकडी येथील शामल टेकाळे, पिंपरी आंबा येथील गुणवंत पालकर, कासार जवळा येथील पीरसाब मौलाना पठाण, मळवटी येथील धनश्री सूर्यवंशी, गाधवड येथील आशाबाई क्षीरसागर आणि गंगापूर येथील प्रल्हाद गायकवाड यांच्या पिठाच्या गिरण्या नादुरुस्त असल्याने बंद आहेत.
फक्त सिकंदरपूर येथील रुक्मिणी ताटे, चाटा येथील सैनिक घोडसे, शिराळा येथील यशवंत कोरे, सामनगाव येथील मंगल डोळचे आणि मळवटी येथील अंजू शिंदे यांची पिठाची गिरणी तात्पुरती चालू आहे. (प्रतिनिधी)
अपंग पुनर्वसन योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने १३३ अपंगांना मिनी पिठाच्या गिरण्यांचे वाटप केले आहे. औसा तालुक्यातील नागरसोगा येथील अनिता माळी यांनाही पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात आले होते. मात्र त्यांची गिरणी बनावट असल्याची तक्रार होती.
४‘लोकमत’ने हा विषय ऐरणीवर घेताच प्रशासन खडबडून जागे झाले असून, लाभार्थी अनिता माळी यांना समाजकल्याण कार्यालयाने पिठाची गिरणी बदलून दिली आहे. लक्ष्मी ट्रेडिंग कंपनीचे प्रतिनिधी, समाजकल्याण विभागातील विस्तार अधिकाऱ्यांनी नागरसोगा येथे जाऊन पिठाची गिरणी बदलून दिली. बदलून दिलेल्या गिरणीचे प्रात्यक्षिक संबंधितांनी लाभार्थ्यास दाखविले. त्यानंतर लाभार्थ्याने मिनी पिठाची गिरणी स्वीकारली.
४‘लोकमत’मुळे पिठाची गिरणी बदलून मिळाली, अशी भावना लाभार्थी अनिता माळी यांनी यावेळी व्यक्त केली. मी समाजकल्याण विभागात दाद मागितली. लोकशाही दिनातही तक्रार केली. परंतु, न्याय मिळाला नाही. ‘लोकमत’ने साथ देताच यंत्रणा हलली आणि गिरणी मिळाली, असेही अनिता माळी म्हणाल्या.
रेणापूर तालुक्यात दहा अपंगांना पिठाच्या गिरण्या या योजनेत मिळाल्या आहेत. गोढाळा येथील तुकाराम अंदुडे, धवेली येथील गणपत शिंदे, पोहरेगाव येथील आशा गायकवाड, सांगवी येथील सुभाष सावंत, कामखेडा येथील रेखा सुरवसे, पानगाव येथील रफिक पठाण, रेणापूर येथील लहू कातळे, कुंभारी येथील एकनाथ फड, रेणापूर येथील सय्यद महेबुब महताबसाब आदींचा यात समावेश आहे. यातील सर्वांच्याच गिरण्या बंद असून, ज्या चालतात त्या पिठाच्या गिरणीतून पिठात खर येते. इलेक्ट्रीक मोटार बंद पडते, असे सुभाष सावंत, गणपत शिंदे, किसन फड, तुकाराम आंदुडे, रफिक पठाण, नामदेव गायकवाड, रेखा सुरवसे यांनी सांगितले.
जळकोट तालुक्यातील पाटोदा येथील दयानंद जाधव, मंगरुळ येथील बाबु करीम सय्यद, जगळपूर येथील दत्ता केसाळे, कुणकी येथील व्यंकट लांडगे यांना अपंग पुनर्वसन योजनेतून पिठाच्या गिरण्या मिळाल्या आहेत. सुंदर सखाराम राठोड यांनी मात्र गिरणी घेतली नाही. व्यंकट लांडगे यांनीही गिरणी स्वीकारली नाही. ज्या गिरण्या मिळाल्या आहेत, त्या नादुरुस्त आहेत. एकही चालत नाही. केवळ ‘शोभेची वस्तू’ म्हणून या गिरण्यांची स्थिती आहे. व्यवसाय तर दूरच. व्यवसायासाठी मोठी गिरणी देणे आवश्यक आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने अपंग पुनर्वसनाच्या नावाखाली गिरण्या देण्याचा भोंगळ कारभार केला आहे.
औसा तालुक्यातील नागरसोगा येथील अनिता माळी यांच्या तक्रारीमुळे मिनी पिठाच्या गिरण्यांचा प्रश्न समोर आला आहे. अनिता माळी यांच्या गिरणीसह अन्य १९ पिठाच्या गिरण्या कुचकामीच आहेत. लाभार्थ्यांना त्याचा काहीही फायदा नाही.
नीळकंठ डोंगरे, रा़देवणी : नीळकंठ डोंगरे हे दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत़ त्यांना मिळालेल्या गिरणीची मोटार व्यवस्थित चालत नाही़ मोठा आवाज येतो़ मेकॅनिकला दाखविले मात्र त्याने मोटार खराब असल्याचे सांगितले़ पत्नी रेखा मजूरकाम करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवतात़
४शिवाजी पंढरपुरे रा़बोरोळ ता़देवणी : पंढरपुरे हे दोन्ही पायांनी अपंग आहेत़ त्यांना देण्यात आलेल्या गिरणीची मोटार १० मिनिटे चालली की जॅम होऊन बंद पडते़ पीठ बारीक होत नसल्याने ग्राहक येत नाहीत़ पत्नी कपडे शिवते़ त्यांना मदत करुन शिवाजी पंढरपुरे उदरनिर्वाह भागवितात़
४विनोद जांभळे, वायगाव ता़उदगीर : जांभळे यांना दोन-तीन महिन्यांपूर्वीच गिरणी देण्यात आली आहे़ परंतु, त्यांनी अद्याप ती सुरु केलेली नाही़
४फकीरा शेख, रा़हेर ता़उदगीर : शेख यांना मिळालेल्या गिरणीवर पीठ बारीक येत नाही़ त्यामुळे ग्राहक शेजारीच असलेल्या मोठ्या गिरणीवर दळणासाठी जातात़ त्यांची गिरणी केवळ घरापुरतीच मर्यादित राहिली आहे़
४शुभांगी जगताप, रा़हेर ता़उदगीर : शुभांगी जगताप यांनाही तीन महिन्यांपूर्वीच गिरणी मिळाली आहे़ परंतु, त्यांच्याही गिरणीस तांत्रिक अडचणी येत आहेत़ त्यामुळे जगताप यांची गिरणीही फक्त घरातील दळणापुरतीच वापरली जात आहे़
४लालासाहेब शेख रा़तोंडार ता़उदगीर : शेख यांना मिळालेल्या गिरणीची मोटार महिन्याभरातच जळून गेली़ तसेच पीठ व्यवस्थित येत नसल्याने त्यांनी मोटार दुरुस्त करुन घेतलीच नाही़ त्यामुळे सध्या गिरणी बंद आहे़
४विठ्ठल बिराजदार, नागलगाव ता़उदगीर : बिराजदार यांना गिरणी मिळाल्यानंतर त्यांनी ती चालू करुन पाहिली़ परंतु, ग्राहक फारसा प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी ती बंद ठेवली आहे़
४मधुकर भोसले, बोंबळी ता़देवणी : भोसले यांना देण्यात आलेली गिरणी सुरु केल्यानंतर त्यात विद्युत प्रवाह उतरत आहे़ आतापर्यंत घरातील चौघांना शॉक बसल्याने भोसले यांनी ही गिरणी पुन्हा सुरु केलीच नाही़
४राम गुंडरे, रा़चवणहिप्परगा ता़देवणी : गुंडरे यांना मिळालेल्या गिरणीत मोटारीवर लोड येऊन सातत्याने बिघाड होत आहे़ दुरुस्त केले तरी मोठे पीठ येत आहे़ त्यामुळे केवळ जनावरांची चंदी काढून देण्यापुरता वापर सुरु असल्याचे गुंडरे यांनी सांगितले़
४भीमा बागुले, रा़टाकळी ता़देवणी : बागुले यांना समाजकल्याणने गिरणी दिली़ परंतु, ती बसविण्यासाठी व सुरु करण्यासाठी आर्थिक अडचण असल्याचे सांगून त्यांनी ती बंदच ठेवली आहे़
४किशन बावळे, रा़हाळी ता़उदगीर : बावळे यांना मिळालेली गिरणी व्यवस्थित चालत नाही़ मोटार सातत्याने थांबते़ पीठ मोठे येत असल्याने त्यांनी ती बंदच ठेवली आहे़
४तुकाराम बनसोडे, हंडरगुळी ता़ उदगीर : बनसोडे यांना देण्यात आलेल्या गिरणीचा फारसा उपयोग होत नाही़ गिरणी सुरु करण्यासाठी लागणारी यंत्रणा त्यांच्याकडे नसल्याने त्यांनीही ती बंदच ठेवली आहे़
बीड येथील पुरवठाधारक असलेल्या लक्ष्मी ट्रेडिंग कंपनीचे सगळ्यात कमी दराची निविदा आल्याने जिल्हा परिषदेच्या समाजकल्याणविभागाने या निविदेला मंजुरी दिली. कंपनीची किंमत १४ हजार ५०० रुपये एका गिरणीची असली, तरी या निविदेनुसार ११ हजार २०० रुपयाने एक पिठाची गिरणी जिल्हा परिषदेला मिळाली आहे. कमी दरातील या पिठाच्या गिरण्या आहेत. त्यामुळेच या बंद पडल्या आहेत. लातूरच्या बाजारपेठेत मिनी पिठाच्या गिरणीची किंमत १८ हजारांच्या पुढे आहे. लातूर जिल्हा परिषदेला मात्र ही गिरणी ११ हजार २०० रुपयाला मिळाली आहे. कंपनीची किंमत मात्र १४ हजार ५०० आहे. त्यामुळे पाणी मुरत असल्याची शक्यता आहे.

Web Title: 126-folds of disabled people are closed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.