मनपातील १२३ कर्मचाऱ्यांच्या वयाचा दाखला निघाला बोगस
By Admin | Updated: June 11, 2014 00:53 IST2014-06-11T00:49:57+5:302014-06-11T00:53:31+5:30
औरंगाबाद : महापालिकेत २००४ साली झालेल्या १,१२४ कर्मचाऱ्यांच्या भरतीत १२३ जणांचा वयाचा दाखला बोगस, तर १७४ जणांच्या दाखल्यातील नावात खाडाखोड असल्याची माहिती पुढे आली आहे.

मनपातील १२३ कर्मचाऱ्यांच्या वयाचा दाखला निघाला बोगस
औरंगाबाद : महापालिकेत २००४ साली झालेल्या १,१२४ कर्मचाऱ्यांच्या भरतीत १२३ जणांचा वयाचा दाखला बोगस, तर १७४ जणांच्या दाखल्यातील नावात खाडाखोड असल्याची माहिती पुढे आली आहे. वयाचा बोगस पुरावा देऊन मनपा सेवेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी वेतनवाढ थांबविण्याऐवजी दंडात्मक कारवाई करून सेवादेश देण्याची शिफारस केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रशासनाने त्या कर्मचारी भरतीतील ५६० जणांना सेवापुस्तिका दिल्या आहेत. मंजूर पदांपेक्षा जास्तीची कर्मचारी भरती करण्यात आली. आरक्षणाचे नियम बदलण्यात आले. या सर्व बाबी तपासण्यासाठी आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी समिती गठीत केली आहे. ज्यांची कागदपत्रे योग्य असतील, त्यांनाच सेवापुस्तिका मिळेत, अशी त्यांची भूमिका आहे.
ही आहे चौकशी समिती
उपमुख्य लेखापरीक्षक महावीर पाटणी, एस.पी. काचावार, बी.बी. साळवे, मधुकर गंगावणे, गोविंद बारबोटे यांच्याकडे १२२ बनावट टीसी असलेले व २६२ सेवापुस्तिका दिलेल्या कर्मचाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी खुला करण्याचे काम आहे. सहा. आयुक्त रोशन मकवाने, अभय प्रामाणिक, रझा अली, विलास भणगे यांची दुसरी समिती नावात फरक असलेल्या १७४ कर्मचाऱ्यांच्या मूळ आदेशानुसार सेवापट तयार करून परिविक्षाधीन कालावधी खुला करण्यासाठी कागदपत्रांची छाननी करील.
आयुक्तांचा निर्णय असा
१,१२४ नोकरभरतीतील ५६४ कर्मचाऱ्यांना सेवापट व परिविक्षाधीन कालावधी खुला करण्याचा निर्णय मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी जानेवारी २०१४ मध्ये घेतला. त्यासाठी त्यांनी विशेष समिती गठीत केली. ही समिती २००७ साली गठीत केलेल्या समितीच्या अहवालावरून ५६४ कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची छाननी करील.
शिपायांना पदोन्नती?
पालिकेतील २५ शिपायांना लिपिक या पदावर पदोन्नती देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. वर्ग-३ च्या १७ व वर्ग-४ च्या १६ अनुकंपा धर्तीवरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. ही पदोन्नती थेट दिली आहे. अनुकंपा धर्तीवरील पदोन्नतीमुळे शिपायांच्या पदोन्नतीची चर्चा सुरू आहे.