१२१ पाणीपुरवठा योजना बंद
By Admin | Updated: December 29, 2014 00:56 IST2014-12-29T00:45:57+5:302014-12-29T00:56:00+5:30
जालना : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यात तब्बल १२१ गावांमधील पाणीपुरवठा नळ योजना बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

१२१ पाणीपुरवठा योजना बंद
जालना : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यात तब्बल १२१ गावांमधील पाणीपुरवठा नळ योजना बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या योजनांसाठी साडेपाच कोटींचा खर्च अपेक्षित असून तसा प्रस्ताव शनिवारी जिल्हापरिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने शासनाकडे पाठविला.
जिल्ह्यात ग्रामीण भागात सद्यस्थितीत १०५२ पाणीपुरवठा नळयोजना आहेत. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. मागील दोन वर्षांच्या काळात काही ठिकाणी नादुरूस्त योजना सुरू करण्यात आल्या. सद्यस्थितीत भूजल सर्वेक्षण व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या संयुक्त पथकाने डिसेंबर महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात १२१ योजना बंद असल्याचे आढळून आले. बहुतांश योजना नादुरूस्तीमुळेच बंद असून काही योजना वर्षानुवर्षे बंद राहत असल्याचेही चित्र समोर आले आहे. या गावांमध्ये टँकरद्वारे किंवा विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे. ज्या गावांमध्ये हातपंप वगैरेंना पाणी असेल, तेथून पुरवठा केला जातो. राज्य शासनाकडून साडेपाच कोटींचा निधी मिळाल्यानंतरच या गावांमधील पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी शनिवारी जिल्ह्यात बंद पडलेल्या योजनांच्या दुरूस्तीसाठी योजनेच्या मूळ खर्चाच्या ३५ टक्के रक्कमेपर्यंतचा निधी देण्याची घोषणा केली. त्यात १५ टक्के रक्कम शासनाकडून तर २० टक्के रक्कम जिल्हा परिषदेकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा निधी जिल्ह्याच्या हाती कधी पडणार, हाच प्रश्न आहे. ४
१५ ते २० वर्षांपासून बंद असलेल्या काही योजना आहेत. काही योजनांचे पाईप खराब झालेले आहेत. योजना पूर्ण झाल्यानंतर ती ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केली जाते.
४ उत्पन्न कमी असलेल्या किंवा मोठ्या प्रमाणावर कराची थकबाकी असलेल्या ग्रामपंचायतींकडून योजनांची देखभाल, दुरूस्ती नियमित केली जाते का, हा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. ४
जिल्ह्यात सध्या २४ गावांमध्ये टँकरद्वारे तर ३४ ठिकाणी विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे. या गावांमध्ये काही ठिकाणी पाणीपुरवठा योजना बंद पडलेल्या आहेत.
४ बंद असलेल्या जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांपैकी एकही कालबाह्य झाली नसल्याचा दावा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.ई. तांगडे यांनी केला आहे.