पाच मिनिटांत १२ विषय मंजूर !
By Admin | Updated: July 9, 2014 00:34 IST2014-07-08T23:00:20+5:302014-07-09T00:34:59+5:30
जालना : नगरपालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अवघ्या पाच मिनिटांत १२ विषय सर्वसंमतीने चर्चेविनाच मंजूर झाले.

पाच मिनिटांत १२ विषय मंजूर !
जालना : नगरपालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अवघ्या पाच मिनिटांत १२ विषय सर्वसंमतीने चर्चेविनाच मंजूर झाले. पालिकेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील ही अखेरची सभा होती. कारण नूतन नगराध्यक्ष निवडणुकीची प्रक्रियाही आजपासूनच सुरू झालेली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सकाळी ११ वाजता नगराध्यक्षा पद्मा भरतिया यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपाध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेला प्रारंभ झाला. सर्वप्रथम भाजपाचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे व काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक पापाखान यांच्या निधनाबद्दल सभागृहाने त्यांना श्रद्धांजली व्यक्त केली.
त्यानंतर आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नगराध्यक्षा भरतिया, उपाध्यक्ष राऊत व मुख्याधिकारी मनोहरे यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर्वसाधारण सभेतील सर्व विषयांना मंजुरी अशा आवाजात उपस्थित सर्वपक्षीय सदस्यांनी १२ विषयांना मंजुरी दिली.
यामध्ये २७ फेबु्रवारी २०१४ रोजी झालेल्या सभेचे कार्यवृत्तांत कायम करणे, नगरपरिषद शिक्षण विभागातील अतिरिक्त शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आस्थापनेवर सामावून घेऊन वेतन करणे याबाबत चर्चा करून निर्णय घेणे, शिक्षण विभागातील शिक्षकांचा पगार आॅनलाईन झाल्यामुळे या विभागास लाईटसाठी इन्व्हर्टर खरेदी करण्यासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान करणे, उपनगराध्यक्षांसाठी असलेल्या स्वतंत्र कक्षाचे नूतनीकरण व सुशोभिकरण करणे, प्रत्येक प्रभागात एल.ई.डी. लाईट बसविण्याकरिता ५ लाख रुपयांपर्यंत प्रशासकीय व वित्तीय मान्यता, शहरात महत्वाच्या ठिकाणी हायमॅक्स बसविणे, नगरपालिका पाणीपुरवठा व न.प. कार्यालयात सेक्युरिटी गार्ड एजन्सीमार्फत नियुक्त करणे, शहरातील विविध ठिकाणी सी.सी. टी.व्ही. कॅमेरे बसविणे, शहरात पार्किंग झोन व तसेच वाणिज्य जागा विकसित करण्यासाठी चर्चा करून निर्णय घेणे इत्यादी विषयांना मान्यता देण्यात आली. पर्यटन विकास कार्यक्रमाअंतर्गत व इतर विविध शासकीय योजना अंतर्गत या वित्तीय वर्षासाठी अनुदान मागणीबाबत प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविणे बाबत चर्चा करून निर्णय घेणे या विषयांनाही मंजुरी देण्यात आली.
विकास योजनेअंतर्गत रेल्वेस्टेशन रोड ते अंबड चौफुली ते मंठा चौफुली वळण रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण, खडीकरण व डांबरीकरण करण्याकरिता प्रस्ताव तयार जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीस्तव पाठविण्याबाबत चर्चा करून निर्णय घेणे, शहरात विविध ठिकाणी पथदर्शक फलक लावणे, वृक्षलागवड करणे, मोतीबागेत नौका विहार सुरू करणे, मोती तलाव येथे तसेच गांधी चमन उद्यान येथे कारंजे बसविणे इत्यादी विषयांना मंजुरी देण्यात आली. सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे रशीद पहेलवान म्हणाले की, २७ व्यावसायिक मालमत्ताधारकांना थकीत रक्कमेबाबत पालिकेने नोटीस बजावली. मात्र ज्या रकमेसाठी ही नोटीस बजावली, ती रक्कम नंतर कमी केली, असा आरोप केला. (प्रतिनिधी)