लातुरात आढळले डेंग्यूचे १२ रुग्ण
By Admin | Updated: September 6, 2015 23:58 IST2015-09-06T23:51:38+5:302015-09-06T23:58:52+5:30
लातूर : लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस डेंग्यूने कहर केला आहे़ महिनाभरात १२ रुग्णांच्या रक्त नमुन्यांचा अहवाल डेंग्यू पॉझिटीव्ह आला आहे़

लातुरात आढळले डेंग्यूचे १२ रुग्ण
लातूर : लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस डेंग्यूने कहर केला आहे़ महिनाभरात १२ रुग्णांच्या रक्त नमुन्यांचा अहवाल डेंग्यू पॉझिटीव्ह आला आहे़ त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना केली नाही तर डेंग्यूचा उद्रेक अधिक तीव्र होण्याची भिती आहे़
लातूर जिल्ह्यात तापीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत़ शासकीय जिल्हा रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले़ ताप वाढत असल्याने काही रुग्णांच्या अंगातील पेशी कमी होण्याचे प्रमाणही निदर्शनास येत आहे, अशा तापीच्या रुग्णांचे रक्त नमुने आरोग्य प्रशासनाच्या वतीने नांदेड येथील प्रयोगशाळेत पाठविले जातात़ मागील महिनाभरात सुरुवातील ५४ रक्त नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते़ तर मागील आठवड्यात २९ रक्त नमुने तपासणीसाठी पाठविले होते़ सुरुवातीच्या ५४ नमुन्यांपैकी ६ नमुने डेंग्यू पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता़ तर २९ नमुन्यांपैकी पुन्हा ६ रुग्णांचे अहवाल डेंग्यू पॉझिटीव्ह असल्याचे हिवताप अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाला आहे़ या ६ रुग्णांपैकी ४ रुग्णही लातूर शहरातील आहेत़ तर दोन रुग्ण निलंगा, उदगीर येथील आहेत़ त्यामुळे हिवताप विभागाच्या वतीने तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात अबेटींग मोहीम राबविली आहे़ तसेच तापाचे रुग्ण आढळल्यास त्यांच्या रक्ताचे नमुने संकलित करुन हिवताप विभागाकडे पाठविले जातात़ हिवताप विभाग हे नमुने नांदेड येथे तपासणीसाठी पाठवतो़