बाळकृष्ण महाराजांचे ११७ वर्षे जुने मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:03 IST2017-10-04T01:03:51+5:302017-10-04T01:03:51+5:30
औरंगाबाद ही संतांची भूमी आहे. त्यातीलच एक संत बाळकृष्ण महाराज. नागेश्वरवाडीतील महाराजांचे समाधी मंदिर बांधून यंदा ११७ वर्षे पूर्ण होत आहेत.

बाळकृष्ण महाराजांचे ११७ वर्षे जुने मंदिर
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद ही संतांची भूमी आहे. त्यातीलच एक संत बाळकृष्ण महाराज. शहरात त्यांचा मोठा शिष्यवर्ग आहे. नागेश्वरवाडीतील महाराजांचे समाधी मंदिर बांधून यंदा ११७ वर्षे पूर्ण होत आहेत. सागवानी लाकूड, दगडाचे बांधकाम असलेल्या या मंदिरात कोणताच बदल करण्यात आला नाही. उल्लेखनीय म्हणजे, हे मंदिर आजही सुस्थितीत आहे. महाराजांची ध्यानस्थ मूर्ती आणि येथील शांत वातावरण भाविकांना मोहित करते.
परमहंस बाळकृष्ण महाराज समाधी मंदिर हे शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही ते एक निवांत ठिकाण आहे. जिल्हा परिषद ते खडकेश्वरपर्यंतच्या रस्त्यावर २४ तास वाहनांची वर्दळ, गोंगाट असला तरी रस्त्याच्या बाजूला असलेल्या या मंदिरात मात्र, शांतीची अनुभूती येते. या दगडी व लाकडी मंदिराकडे पाहिले की, कोकणातील मंदिरांची आठवण येते. बाळकृष्ण महाराजांचा स्वभाव थोडा अवलिया स्वरूपाचा, विचारीवृत्तीचा होता. त्यांनी कधीच कशाचा विधिनिषेध मानला नव्हता. जात-पात, सोवळे-ओवळे त्यांना मान्य नव्हते. नाटू भटजी व ललिताबाई, अशी त्यांच्या माता-पित्यांची नावे होत. महाराजांच्या अनेक लीलांचे वर्णन ‘परमहंस बाळकृष्ण महाराज चरित्रा’मध्ये लिहून ठेवले आहे. या चरित्रात लिहिण्यात आले आहे की, महाराजांचे मित्र शहरातील सूफी संत बनेमियाँ हे होते. त्यांच्या दोस्तीचे किस्सेही तेव्हा गाजले होते. महाराजांनी कोणाला मारले, शिव्या हासडल्या की, त्या व्यक्तीचा दिवस चांगला जात असे, असे लोक मानत असत. त्यांनी आजन्म ब्रह्मचर्य व्रताचे पालन केले. ११७ वर्षांपूर्वी आश्विन कृष्ण तृतीयेच्या दिवशी त्यांचे देहावसान झाले. नागेश्वरवाडी येथील त्यांच्या घरी समाधी उभारण्यात आली. तेथेच दगड व लाकडाच्या साह्याने समाधी मंदिर उभारण्यात आले. आजही मंदिर त्याच अवस्थेत आहे. मंदिराच्या दक्षिण बाजूस तळघरात जाण्याचा रस्ता आहे. त्या ठिकाणाहून सहा पायºया खाली उतरल्यावर तेथे महादेवाच्या पिंडीचे दर्शन होते.