११७ कोटींच्या खर्चास मान्यता
By Admin | Updated: July 14, 2014 01:03 IST2014-07-14T00:17:11+5:302014-07-14T01:03:24+5:30
हिंगोली : जिल्हा वार्षिक योजनेच्या सन २०१३-१४ च्या मार्चअखेर झालेल्या ११७ कोटी ३७ लाख ३८ हजार रुपयांच्या खर्चास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

११७ कोटींच्या खर्चास मान्यता
हिंगोली : जिल्हा वार्षिक योजनेच्या सन २०१३-१४ च्या मार्चअखेर झालेल्या ११७ कोटी ३७ लाख ३८ हजार रुपयांच्या खर्चास पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस खा. राजीव सातव, आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, आ.जयप्रकाश दांडेगावकर, विधान परिषद सदस्य रामराव वडकुते, जि.प.अध्यक्षा मिनाक्षी बोंढारे, जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, जिल्हा वार्षिक योजना २०१३-१४ चा मार्चपर्यंत ९९.१६ टक्के खर्च झालेला आहे. ज्या विभागाचा निधी अखर्चित आहे त्या संबंधित विभागांनी विकासकामांसाठी देण्यात आलेला निधी संंबंधितांकडून प्रशासकीय व तांत्रिक मान्यता घेऊन त्वरित खर्च करावा. तसेच या अंतर्गत प्रस्तावित विविध विकासाची कामे जलदगतीने पूर्ण करण्याची सूचनाही त्यांनी केली. या शिवाय जिल्हा परिषदेने मागील निधी पूर्णत: खर्च करण्याबाबत दक्षता घ्यावी व अहवाल सादर करावा. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आरोग्य केंद्रात नियमित उपस्थित रहावे. गैरहजर राहणाऱ्यांवर जिल्हा परिषद प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी. ग्रामीण भागात विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत पालकमंत्र्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. मानव विकास कार्यक्रमाचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करण्याची सूचनाही केली.
प्रारंभी जिल्हा नियोजन समितीच्या यापूर्वी झालेल्या बैठकीतील अनुपालन अहवालावर चर्चा झाली. त्यानंतर जिल्हा वार्षिक योजना २०१३-१४ च्या मार्चअखेर झालेल्या खर्चाचा योजनानिहाय आढावा घेण्यात आला. नियोजन अधिकारी खंदारे यांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०१३-१४ अंतर्गत सर्वसाधारण योजनेचा मंजूर निधी ७२ कोटी व खर्च ७१ कोटी ९० लाख ४० हजार (खर्चाची टक्केवारी ९९.८७ टक्के), अनुसूचित जाती उपाययोजनेला मंजूर निधी २६ कोटी ५५ लाख व खर्च २५ कोटी ४३ लाख (खर्चाची टक्केवारी ९९.६८ टक्के) व आदिवासी उपाययोजनेला मंजूर निधी २१ कोटी ४९ लाख ९५ हजार
(खर्चाची टक्केवारी ९६.११ टक्के) असे एकूण ११७ कोटी ३७ लाख ३८ हजार (९९.१६ टक्के) निधी खर्च झाल्याची माहिती दिली. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडील मागास क्षेत्र विकास निधी २०१४-१५ च्या २९ कोटी ९९ लाख ९८ हजारांचा वार्षिक आराखडा सीईओ बनसोडे यांनी नियोजन समितीकडे सादर केला. या आराखड्यास नियोजन समितीने मान्यता दिली. (प्रतिनिधी)